गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ आणि वित्त आयोग निधीवर सकारात्मक चर्चा
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळाच्या विकासाच्या गतीमानतेसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या निधीवर चर्चा झाली.
राज्यात गडचिरोलीला पोलाद क्षेत्रात विकसित करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असून, गडचिरोलीला “स्टील सिटी” म्हणून उभारण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच नागपूर विमानतळ प्रकल्पाच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित विषयांवरही चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे आग्रह धरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.
याशिवाय, वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट महाराष्ट्रात आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ही समिट 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. तसेच, आयआयटीच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देणार असल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले.