By: डॉ. अशोक ढवळे
कॉम्रेड लहानू कोम यांच्या जाण्याने १९४५-४७ सालच्या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या तालमीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील एक ध्येयनिष्ठ आणि झुंझार आदिवासी नेतृत्व हरपले आहे. अत्यंत चाणाक्ष, अभ्यासू, लढाऊ व प्रतिभाशाली नेता आज आपल्याला सोडून गेला आहे.
लहानू शिडवा कोम हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि अखिल भारतीय किसान सभेचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचे २८ मे २०२५ रोजी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्रात त्यांच्यापेक्षा जास्त बुजुर्ग असे पक्षाचे एकच नेते आता राहिले आहेत, आणि ते आहेत डहाणू तालुक्याचेच ९५ वर्षे वयाचे लक्ष्मण बापू धनगर. लहानू कोम यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, पक्षाच्या आणि जनवादी महिला संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या हेमलता कोम, दोन अपत्ये आणि तीन नातवंडे आहेत.
लहानू कोम यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३८ रोजी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील आगवण गावातील एका गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबात झाला. शिडवा हे त्यांचे वडील आणि लखमी ही त्यांची आई. त्यांचे ४थी पर्यंतचे शिक्षण गावात, आणि ५वी ते ११वी (तेव्हाची मॅट्रिक) पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. आदिवासींमध्ये त्या काळात मॅट्रिक झालेले फारच कमी जण असत. पदवी शिक्षणासाठी कॉलेजात जायचा त्यांचा विचार होता, पण तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती. त्यात ते सामील झाले आणि पुढील शिक्षण सोडून दिले. दीड-दोन वर्षे त्यांनी डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
गरिबांविषयीचा कळवळा हा त्यांचा मूळ पिंड असल्यामुळे ते सुरुवातीला भूदान चळवळीकडे ओढले गेले. विनोबा भावे, आचार्य भिसे अशा भूदान चळवळीच्या नेत्यांसोबत ते फिरले. पण त्या चळवळीचा फोलपणा त्यांच्या लवकरच लक्षात येऊ लागला. डहाणू, तलासरी, पालघर आदि तालुक्यांत कम्युनिस्ट पक्षाचा व किसान सभेचा जोर होता. लहानू कोम तेव्हा शामराव व गोदावरी परुळेकरांना भेटले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, मार्क्सवादाचे वाचन केले, आणि या सर्वांमुळे प्रभावित होऊन १९५९ साली केवळ २० वर्षांच्या तरुण वयात ते अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. लवकरच ते पूर्णवेळ कार्यकर्ते बनले आणि गेले साडेसहा दशकांहून अधिक काळ डहाणू, जव्हार आणि तलासरी तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष राहून त्यांनी पक्षाचे, किसान सभेचे आणि समाज परिवर्तनाचे अविरत काम केले.
पक्षाच्या आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकाळात सावकार-जमीनदारांविरुद्ध शेतकरी-शेतमजुरांचे अनेक तीव्र वर्गसंघर्ष आणि जनसंघर्ष झाले (ते संख्येने इतके होते आणि इतक्या विविध प्रकारचे होते की जागेअभावी त्यांचा येथे उल्लेख करणेही निव्वळ अशक्य आहे). या आंदोलनांत त्यांना अनेकदा अटक झाली. पन्नाशीच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, १९६२-६६ या काळात आणि पुन्हा १९७५-७७ या आणीबाणीच्या काळात त्यांनी एकूण सुमारे ५ वर्षे तुरुंगवास भोगला.
त्यांच्या कार्याच्या जोरावर ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे जिल्हा कमिटीचे, महाराष्ट्र राज्य कमिटीचे, आणि पुढे महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाचे सदस्य झाले. तसेच अखिल भारतीय किसान सभेचे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षही निवडले गेले. अनेक दशके त्यांनी ही महत्त्वाची पदे समर्थपणे सांभाळली. काही वर्षांपूर्वी वय आणि प्रकृतीच्या कारणांस्तव ते स्वतःच या पदांवरून निवृत्त झाले.
लहानू कोम १९६२ मध्ये पहिल्यांदा ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून आले (पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून खूप नंतर म्हणजे २०१४ साली वेगळा झाला) आणि १९७७ पर्यंत त्या पदावर त्यांची फेरनिवड होत राहिली. १९७७च्या आणीबाणीनंतरच्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीत लहानू कोम ठाणे जिल्ह्याच्या डहाणू (अज) मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. त्याच निवडणुकीत अहिल्या रांगणेकर आणि गंगाधर अप्पा बुरांडे हे सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अनुक्रमे मुंबई आणि बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आले, आणि १९८० मध्ये लोकसभा विसर्जित होईपर्यंत ते सर्व त्या पदावर राहिले.
त्यानंतर १९८०, १९८५ आणि १९९०च्या विधानसभा निवडणुकीत लहानू कोम तत्कालीन जव्हार (अज) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तीनदा निवडून आले आणि १९९५ पर्यंत आमदार राहिले. त्यांनी लोकसभेत आणि विधानसभेत सातत्याने सर्वसामान्य शेतकरी-कामगार जनतेचे, महिला आणि तरुणांचे, आणि विशेषतः आदिवासींचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले आणि लढवले. दोन्ही सदनांत ते एससी/एसटी/एनटी समितीचे सदस्य होते आणि काही काळ अध्यक्षही होते.
१९६२ मध्ये शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या संस्थापक सदस्यांमध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, आणि बलराज साहनी यांच्यासारखी महाराष्ट्रातील दिग्गज नावे होती. लहानू कोम यांची त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि अखेरपर्यंत ते या पदावर राहिले. लहानू कोम यांच्या पुढाकाराने, आदिवासी प्रगती मंडळाने अनेक शाळा, वसतिगृहे, व कनिष्ठ महाविद्यालये उभी केली. १९९४ साली मंडळाने कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांच्या नावे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे एक वरिष्ठ महाविद्यालयही उभारले. त्यास मुंबई विद्यापीठाने अनुमती नाकारली, तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. शरद पवार यांनी आदिवासी भागातील शिक्षणाचे महत्त्व ओळखून राज्य सरकारतर्फे या वरिष्ठ महाविद्यालयाला अनुमती दिली, आणि मग विद्यापीठालाही अनुमती द्यावी लागली! तलासरी आणि डहाणू तालुक्यांमधील या सर्व दर्जेदार संस्थांमध्ये आज एकूण ८,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतेक मुलेमुली हे गरीब आदिवासी कुटुंबांतील आहेत. या शिक्षणसंस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भरीव योगदानाने आजवर लाखो विद्यार्थ्यांना येथे उत्तम शिक्षण मिळाले आहे.
लहानू कोम यांच्याशी माझा संपर्क सुमारे ४५ वर्षांपूर्वी १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस प्रथम आला. मी अलीकडेच १९७८ साली पक्षात प्रवेश केला होता आणि माझी १९८१ साली स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेचा राज्य सरचिटणीस म्हणून निवड झाली होती. एकदा लहानू कोम यांनी तलासरीत विद्यार्थ्यांच्या बैठकीसाठी मला बोलावले. त्यांची खासदारकी नुकतीच संपली होती आणि आमदारकी सुरू झाली होती. ठाणे जिल्ह्यात शामराव व गोदूताईंच्या नेतृत्वाखाली झालेल्या जोरदार संघर्षांबद्दल आणि त्यात लक्ष्मण धनगर, कृष्णा खोपकर, लहानू कोम इत्यादींच्या योगदानाबद्दल मी ऐकले होते. तेव्हा चाळीशीत असलेली लहानू कोम यांच्यासारखी लहानशी मूर्ती एवढं सगळं कसं काय करू शकते, याबद्दल माझ्या मनात आदर आणि कुतूहल दोन्ही होते. त्या बैठकीत व त्यानंतरच्या अनेक बैठकींत व शिबिरांत ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात एसएफआय ची बांधणी करण्यात त्यांनी केलेले मोठे योगदान मी कधीच विसरू शकणार नाही. विद्यार्थ्यांना प्रभावीपणे साद घालणारी त्यांची स्टाईल, विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप झटपट करण्याची त्यांची विलक्षण क्षमता, पुढील बैठकीत त्यावर चेकअप ठेवण्याची पद्धत, या सर्वांचा माझ्यावर मोठा परिणाम झाला.
पुढे डीवायएफआय या युवा संघटनेत मी काम करत असताना तसाच अनुभव आला. लहानू कोम यांनी तेव्हा युवा समुदायाला आकर्षित करण्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली, आणि अनेक वर्षे तो अखंडपणे चालला. दर वर्षी १ ऑक्टोबर या चिनी क्रांतिदिनी सायंकाळी तलासरीत जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींची एक जबरदस्त जाहीर सभा व्हायची. त्यात आम्ही युवा पिढीला रुचेल अशा प्रकारे प्रचलित राजकारण आणि आव्हाने मांडायचो. त्यानंतर रात्री गाण्यांच्या तालावर या भागातील आदिवासींमध्ये लोकप्रिय असलेले तारपा नृत्य सुरू व्हायचे. सभा संपल्यानंतर रात्री १०च्या सुमारास सुरू झालेले तारपा नृत्य संपायचे ते दुसऱ्या दिवशी पहाटे! आदिवासी युवक-युवती बेभान होऊन रात्रभर नाचायचे! सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संघटना कशी बांधायची याचे शिक्षणच जणू आम्हाला त्यातून मिळाले!
त्यानंतर किसान सभा आणि अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आम्ही दोघांनी अनेक लढ्यांत एकत्र काम केले. २६ जानेवारी १९९७ रोजी तलासरी तालुक्यात कवाडा गावात भाजप-प्रणित राज्य सरकारच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्या बीज आणि बाबू खरपडे या पक्षाच्या दोन तरुण आदिवासी कार्यकर्त्यांना आलेले हौतात्म्य, त्यानंतर सरकारने पक्षावर केलेली भयानक दडपशाही, त्यात लहानू कोम व इतर अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना झालेला तुरुंगवास, या सर्वाला पक्षाने जिल्हाभर केलेला जबरदस्त प्रतिकार, आणि लगेच आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवून पक्षाने खेचून आणलेला विक्रमी विजय, ही एक वेगळी रोमहर्षक कहाणीच आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यात १९७५-७७, २००६-०९, आणि २०१४-१५ अशा तीन वेळा खूप बिकट पक्षांतर्गत प्रसंग आले. त्यांची अंधुकशी कल्पनाही जिल्ह्याबाहेरच्या, किंवा जिल्ह्यातल्याही नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांना येणे कठीण आहे. या तिन्ही प्रसंगांत गोदावरी परुळेकर (पहिल्या प्रसंगात), लहानू कोम, हेमलता कोम, एल. बी. धनगर, कृष्णा खोपकर, बारक्या मांगात, रतन बुधर व इतर अनेक पट्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात जे अप्रतिम कार्य केले त्याला तोड नाही. या यशस्वी लढ्यांच्याच परिणामी आज ठाणे-पालघर जिल्ह्यातील पक्षाची ताकद व प्रभाव टिकून आहे, आणि वाढत आहे. एखादा नेता कितीही मोठा असला, तरी त्याच्यापेक्षा कम्युनिस्ट पक्ष आणि त्याचा विचार कधीही जास्त श्रेष्ठ असतो ही गोदूताईंनी दिलेली शिकवण या तिन्ही संघर्षांत कामी आली.
१९६९ साली झालेल्या त्यांच्या लग्नापासून हेमलता कोम यांचा लहानू कोम यांच्या जीवनकार्यात अविभाज्य वाटा राहिलेला आहे. त्या स्वतः पक्षाच्या नेत्या व राज्य कमिटी सदस्या राहिल्या आहेत, जनवादी महिला संघटनेच्या जिल्ह्याच्या संस्थापक अध्यक्षा व माजी केंद्रीय कमिटी सदस्या राहिल्या आहेत, तलासरी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून त्या पूर्वी अनेकदा निवडून आलेल्या आहेत. आदिवासी प्रगती मंडळाच्या शैक्षणिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. लहानू कोम यांच्या जाण्याने सर्वात मोठा आघात अर्थात त्यांच्यावर झाला आहे.
लहानू कोम यांचा मनमिळाऊ स्वभाव, एखाद्या संघर्षाचे अथवा कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्याची क्षमता, एखादी जबाबदारी पार पाडण्याची त्यांची जिद्द, आणि अर्थातच त्यांची अपार ध्येयनिष्ठा, या सर्वाला तोडच नाही. त्यांच्यापासून अनेक पैलू मला शिकता आले हे मी माझे भाग्य समजतो.
लहानू कोम यांच्या निधनाने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आणि किसान सभेनेच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व डाव्या व पुरोगामी शक्तींनी, आणि एकूणच आदिवासी चळवळीने एक लढाऊ व लोकप्रिय जननेता गमावला आहे. आजच्या पक्षबदलूंच्या जमान्यात आपल्या राजकीय आयुष्याची तब्बल ६६ वर्षे लहानू कोम लाल झेंड्याशी एकनिष्ठ राहिले. मार्क्सवाद-लेनिनवादावरील आणि श्रमिक जनतेवरील अढळ वैचारिक निष्ठा हेच त्याचे रहस्य आहे!
कॉम्रेड लहानू कोम यांना अखेरचा लाल सलाम !
कॉम्रेड लहानू कोम अमर रहे !