काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
Twitter : @NalavadeAnant
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपच्याच सरकारने चिघळवला आहे.भाजप आरक्षण विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मराठा समाजासह मागास समाजांना आरक्षण द्यायचे असेल तर सध्याची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे. ही मर्यादा हटवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. पण केंद्रातील भाजप सरकार त्यासंदर्भातील निर्णय घेत नाही. मराठा आणि धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आले आणि त्यानंतर त्यांनी या सामाजाला आरक्षण दिले नाही.
ते म्हणाले, विधानसभेतही घाईगडबडीत मराठा आरक्षणाचा कायदा केला, पण तोही सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो, अशी गर्जना फडणवीस यांनी केली होती. पण सत्तेत येऊन दीड वर्ष होऊनही अजून मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही, असा आरोपही पटोले यांनी केला.
राज्यातील तिघाडी सरकारने आज पुन्हा एक बैठक घेऊन मराठा आरक्षणावर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एक महिनाचा वेळ सरकारने मागितला आहे, हा प्रकार वेळकाढूपणाचा आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मविआ सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण दिले असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मग ते सर्वोच्च न्यायालयात का टिकले नाही? फडणवीसांनी केंद्र सरकराशी बोलून मराठा आरक्षणाचा नवव्या सूचीत समावेश का केला नाही ?असे सवाल पटोले यांनी केले.
मुळात भाजपला आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट आहे. आजच्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय सरकारने जाहीर केला नाही. सरकारने समाजासाठी काही निर्णय घेतले याची यादी वाचून दाखवण्यात आली. पण मराठा समाजाला आरक्षण कसे देणार यावर एक शब्दही काढला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.