सचिन सावंत यांची सरकारवर टीका
Twitter : @vivekbhavsar
मुंबई
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये परिवार वादाबद्दल जाहीरपणे टीका केली होती. या तिन्ही पक्षातील नेते आपल्या मुलांसाठी – मुलींसाठी राजकारण करतात, फायदा घेतात, असा आरोप त्यांनी जाहीर सभेतून केला होता. मात्र यास मोदींच्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित अपवाद ठरले आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. डॉ गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्या संस्थेला कृषी प्रक्रिया उद्योगासाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले, हा परिवार वाद नाही का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर या योजनेखाली शेतकरी किंवा छोट्या उद्योजकांसाठी कृषी प्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर तयार करण्याची केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाची एक योजना आहे. या योजनेखाली देशभरातील 70 कृषी प्रक्रिया उद्योग कंपन्यांसाठी केंद्राने क्लस्टर मंजूर केला आहे. या योजनेखाली महाराष्ट्रातील तेरा कंपन्यांना कोट्यावधींचे अनुदान मंजूर झाले आहे.
या यादीतील कंपन्यांकडे अंगुली निर्देश करताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या परिवारवादावर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी सांगितले की, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्या रेवा तापी व्हॅली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या कंपनीने सादर केलेल्या 27 कोटी 6 लाख रुपये खर्चाच्या क्लस्टरला केंद्र सरकारने दहा कोटीचे अनुदान मंजूर केले आहे.
सचिन सावंत म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षातील नेत्यांवर परिवार वादाचा आरोप करतात. भोपाळ येथील जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करून ते कसे परिवारवादाला खतपाणी घालतात याकडे लक्ष वेधले होते. मात्र या भाषणानंतर तिसऱ्याच दिवशी शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे पक्षातील असंख्य आमदारांना घेऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले.
सचिन सावंत म्हणतात की, अन्य पक्षातील नेते करतात तो परिवार वाद आणि भारतीय जनता पक्षातील नेते मंत्री आपल्या मुलांची राजकीय आणि आर्थिक सोय करतात हा परिवारवाद नाही का? सावंत यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील तुषार रंधे यांच्या मधुर फूड पार्क या संस्थेच्या 25 कोटी 84 लाख रुपयांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगाला दहा कोटीचे अनुदान सरकारने मंजूर केले आहे. तुषार रंधे हे विजयकुमार गावित यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात, असा दावा सचिन सावंत यांनी केला.