नवी दिल्ली
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बुधवारी (१३ फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या वेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंडिया आघाडीच्या जागावाटप बैठकीत घेण्यात आला निर्णय
सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत आघाडी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली होती. या वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना राज्यसभेतून सभागृहात पाठवावे, अशीही चर्चा झाली. मात्र, प्रियांका गांधी यांनी ही ऑफर नाकारली, त्यानंतर सोनिया गांधी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत.
2019 मध्ये सोनिया गांधी यांनी सार्वत्रिक निवडणूक लढवताना ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचं सांगितले होतं. त्या 1999 पासून लोकसभेच्या सदस्य आहेत. यंदा पहिल्यांदा त्या राज्यसभेत जाऊ शकतात.
सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशीही चर्चा पक्षाच्या बैठकीत झाली. रायबरेलीची जागा गांधी कुटुंबासाठी खास आहे. सोनिया गांधींपूर्वी या जागेवरून फिरोज गांधी, इंदिरा गांधी, अरुण नेहरू आदींनी निवडणूक लढवली होती.