मुंबई – महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असताना “सरकार पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून स्वतःची पाठ थोपटत आहे, पण जनतेच्या हाती निराशाच आली आहे” अशी टीका करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला एक वर्षाच्या कामगिरीची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली.
वडेट्टीवार म्हणाले, “सरकार उपलब्धीची यादी मिरवत असले तरी वास्तव वेगळे आहे. शेतकरी, महिला, कुपोषित बालकं, रस्ते, कायदा-सुव्यवस्था – सर्वच क्षेत्रांत परिस्थिती बिकट आहे. म्हणूनच सरकारने श्वेतपत्रिका जारी करून जनतेसमोर सत्य मांडावे.”
वडेट्टीवारांनी सरकारच्या वर्षभरातील अपयशांची यादी मांडत सांगितले, महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या झाल्या, शेतमालाला हमीभाव मिळत नाही, बियाणे–खत टंचाई कायम आहे, मराठवाड्यातील पुरामुळे शेतकरी उध्वस्त झाला असताना सरकारची मदत अपुरी आहे, राज्यातील कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे, रस्त्यांची दुरावस्था – “संपूर्ण राज्याची चाळण झाली आहे”, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, बिल्डर–मंत्री यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, लाडक्या उद्योगपतींना लाभ होतोय, पण सामान्य जनता संघर्षात आहे. “या सर्व कारणांमुळे राज्य सरकारने आपल्या कामगिरीचा खुलासा करणे अपरिहार्य झाले आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उघड उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, परवानगीपेक्षा अवैध कोळशाचे उत्खनन सुरू आहे, लाखोंचा कोळसा खुल्या बाजारात विकला जातो आहे, पर्यावरण विभागाने 2023 मध्ये घातलेल्या अटींचा भंग होतो आहे,
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. “पर्यावरण मंत्रालयापासून वन अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सहभागी आहेत. या घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत मोठा प्रश्न उपस्थित करू,” असा इशारा त्यांनी दिला.
महायुती सरकारने विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता अद्याप नियुक्त केलेला नाही, यावरही वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले.
ते म्हणाले, “हे सरकार लोकशाही आणि संविधानाचा आदर करत नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष अनिवार्य असतो; पण या सरकारला विरोधक नकोत, आवाज नको म्हणून पद रिक्त ठेवले आहे.
नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पातळीवर घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

