मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा करून भाजप-युतीने सत्ता मिळवली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यास केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
टिळक भवन येथे आयोजित बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य गुरदीपसिंग सप्पल, डेटा अनालिटिक्स विभागाचे प्रमुख प्रविण चक्रवर्ती, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि ३० विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रविण चक्रवर्ती म्हणाले, “लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्यात ४० लाख मतदारांची अचानक भर कशी पडली? विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचे मताधिक्य लोकसभा निवडणुकीपेक्षा ७० लाखांनी वाढले, पण मविआचे मताधिक्य मात्र स्थिर राहिले. ही आकडेवारी संशयास्पद आहे.”
गुरदीपसिंग सप्पल यांनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटले, “मतदार यादीतील बदलांची माहिती मागितल्यास आयोग तीन-तीन महिन्यांचा वेळ मागतो, पण स्पष्ट उत्तर देत नाही. त्यांच्या संगणक प्रणालीत सर्व माहिती आहे. ती केवळ कॉपी-पेस्ट करायची, मग सहा महिने का लागतात?”
स्वारगेट येथे महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महिलेकडून प्रतिकार झाला नाही असे बेताल आणि असंस्कृत विधान केले. यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हेगाराचे समर्थन केले आहे का? अशा विकृत मानसिकतेच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून त्वरित हाकलले पाहिजे.”
सपकाळ म्हणाले, “राहुल गांधी यांनी संसदेत मतदार यादीतील घोटाळ्यावर प्रश्न विचारला, पण सरकार चौकशीपासून पळ काढत आहे. त्यामुळे हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात नेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.”