ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 कोटींचा खर्च; पर्यटन विभागाने केले हात वर; ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ

सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले; काम करणारे ठेकेदार लागले भिकेला

Twitter : @milindmane70

मुंबई

शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे 2 जून व  तिथीप्रमाणे सहा जून रोजी साजरा झालेल्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार व खासदार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी शासनाने तब्बल 5 कोटी 60 लक्ष 50 हजार रुपये या सोहळ्यावर खर्च केले. मात्र, चार महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने या कामाचे ठेकेदार भिकेला लागले आहेत. पर्यटन व सांस्कृतिक विभाग या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार हाकायचा, निवडणूक असो की प्रचार सभा, उद्घाटने अथवा जाहीर सभा, या सर्व ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावाचा उदो उदो करायचा, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेण्याचे काम राज्यातील सरकारच्या मंत्र्यांकडून होत नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच झालेला शिवराज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याचे पैसे अदा करण्याबाबत चालढकलपणा सुरू आहे. या सोहळ्याचे काम करणाऱ्या एजन्सी धारकांना बिले अदा करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे एजन्सीधारक मेटाकुटीस आले आहेत.

ऐन उन्हाळ्यात रायगडावरील पाण्याचे स्त्रोत्र आटल्याने रायगडावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यासाठी महाडपासून थेट रायगड किल्ल्याच्या (Raigad Fort) पायथ्याशी पाचाडपर्यंत टँकरने पाणीपुरवठा व शिवभक्तांना बिसलरी पाण्याच्या बाटल्या ते शिवभक्तांना भोजन व्यवस्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व रायगडावरील दैदीप्यमान सोहळ्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 5 कोटी 60 लक्ष 50 हजार रुपये खर्चाला मान्यता दिली होती. शिवराज्याभिषेक सोहळा (Coronation Day Ceremony) संपन्न होऊन आज तीन महिन्याहून अधिक कालावधील उलटला. मात्र, या सोहळ्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांनी केलेल्या मेहनतीचे पैसे देण्यात राज्याचा पर्यटन व सांस्कृतिक विभाग (Tourism and Cultural department) टाळाटाळ करीत असल्याचे जिल्हा नियोजन समितीकडून सांगण्यात येत आहे.

खर्चासाठी खासदार सुनील तटकरे यांची शिफारस

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून तब्बल दहा लक्ष शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. असे असले तरी शासकीय आकडेवारीनुसार पाच लाखाच्या आसपास राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त या सोहळ्यासाठी आले होते.   यासाठी रायगडावर पाणी व्यवस्थेपासून शौचालय ते विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटर, लाखो शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था व महाड ते पाचाड पर्यंत एसटी महामंडळातर्फे मोफत एसटी बस वाहतूक व्यवस्था करण्यासाठी तब्बल 5 कोटी 60 लक्ष 50 हजार रुपयांची तरतूद दिनांक 30/7/2023 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला. रायगडचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी या कामावरील खर्च क वर्ग पर्यटन स्थळाचा विकास करणे या योजनेअंतर्गत न करता या कामासाठी लागणारा निधी शासन स्तरावरून अधिकचा मागण्यात यावा, असे सूचित केले होते. त्याला जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीचा सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली व त्या अनुषंगाने या कामावरील खर्च भागवण्यासाठी शासन स्तरावरून अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत (DPDC) शासनाकडे करण्यात आली होती.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी पुढील प्रमाणे:

(1) सोहळ्यासाठी 1.6.2023 ते 6.6.2023 दरम्यान किल्ले रायगड ते पाचाडदरम्यान तात्पुरते शौचालय, बाथरूम, वॉश बेसिन बसवणे रुपये – रुपये 97.16 लक्ष

(2) राज्याभिषेक सोहळ्याकरता 1.6.2023 ते 6.6.2023 दरम्यान महाड, शेडवू नाका व महाड एमआयडीसी ते पाचाड येथे टॅंकरने पाणीपुरवठा करणे – रुपये 24.24 लक्ष रुपये

अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला

शासनाने नेमून दिलेल्या खर्चापेक्षा रायगडावर अभूतपूर्व पाणीटंचाई असल्याने व पाच लक्ष शिवभक्त आल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाने शासनाने नेमून दिलेल्या खर्चापेक्षा सुमारे 25 लक्ष रुपये जास्त खर्च पाण्यावर केला. या खर्चाला रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बोस्टेलवाड, जिल्हाधिकारी योगेश म्हशे, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार वेंगुर्लेकर यांच्यासह महाडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तसेच कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत सर्व बिल अदा करण्याचे तोंडी कबूल केले. मात्र राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर मात्र या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले हात वर केले असून आता वाढीव बिल देण्यास व त्याबाबत शासनाला शिफारस करण्यात सर्व अधिकारी नकारघंटा देत आहेत. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

(3) राज्याभिषेक सोहळ्यासाठी दिनांक 1.6.2023 ते 6.6.2023 दरम्यान पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत जोडणी व जनरेटर व्यवस्था करणे – रुपये 8.62 लक्ष

(4) रायगड किल्ला व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाल्याने व शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या सुमारे पाच लक्षच्या वर असल्याने आलेल्या शिवभक्तांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरमार्फत पाणीपुरवठा केल्यानंतरही येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याकरता प्रति व्यक्ती एक लिटर बाटलीबंद पाणीपुरवठा करणे – रुपये 45 लक्ष.

केवळ पाणीपुरवठा व शौचालय या कामासाठी 1 कोटी 72 लक्ष 2 हजार रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती.

(5) रायगड किल्ल्यावर शिवभक्तांची लाखो संख्या बघता विद्युत यंत्रणा बंद पडू नये, यासाठी अत्यावश्यक सुविधेसाठी विद्युत जनित्र पाच केवी डिझेलसाठी 2 लक्ष 7 हजार रुपये खर्चाची तरतूद होती.

(6) शिवभक्तांवर व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा बसवणे, यासाठी 9 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली होती.

(7) रायगड किल्ल्यावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी स्पीकरद्वारे योग्य तो संदेश देण्यासाठी ऍम्प्लिफायर बसवण्यासाठी 1 लक्ष 80 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(8) रायगडावरील शिवभक्तांची गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रिप्लेटिंग जॅकेट, नायलॉन रोप, ट्राफिक बॅटन, सर्च लाईट इत्यादीसाठी 2 लक्ष 10 हजार रुपयाची तरतूद करण्यात आली होती.

(9) रायगडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या गर्दीमध्ये आपत्कालीन परिस्थिती म्हणून घ्यावयाचे उपाय योजनेसाठी स्ट्रेचर, सेफ्टी हेल्मेट, फर्स्ट एड किट, हेल्मेट विथ हेड लॅम्प रोप लॅन्डर ॲल्युमिनियम 50 फूट, स्लीपिंग बॅग, सोलर lantarn, इत्यादीसाठी 8 लक्ष 72 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(10) रायगड किल्ल्यावर होणारी गर्दी पाहता या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांसाठी कॅम्पिंग बेड चार व्यक्तींकरता खरेदी करणे, या सर्व सुविधांसाठी 23 लक्ष 69 हजार रुपयाची तरतूद करण्यात आली होती.

(11) महाड ते पाचाड या रस्त्याच्या काँक्रीटिकरण करण्याचे काम चालू असल्यामुळे एकेरी मार्ग वाहतूक चालू होती. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महाड ते पाचाड येथून एसटी महामंडळाच्या बसमधून शिवभक्तांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती. त्यासाठी एसटी महामंडळातून 1050 बसेस 1 जून ते 7 जून 2023 या कालावधीत पुरवण्यात आल्या होत्या. त्यासाठी 2 कोटी 20 लाख 17 हजार रुपये खर्च करण्यात आले.

(12) रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांना किल्ल्याचा मार्ग, दिशादर्शक फलकांनी दाखवण्यासाठी 4 लक्ष 25 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(13) शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवभक्तांच्या भोजन व्यवस्थेसाठी 20 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(14) शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या वाहनांच्या भाड्यापोटी 30 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(15) राज्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तयार केलेल्या सविस्तर माहिती पटासाठी 4 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

(16) शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान घडी पुस्तिका, पुस्तिका, स्टिकर्स, स्मृतिचिन्ह यासाठी 13.83 लक्ष रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

(17) शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मुख्य कार्यक्रमाची पूर्व प्रसिद्धी, कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रण, थेट प्रक्षेपण कार्यक्रमानंतरचा 30 मिनिटांचा सविस्तर टीव्ही वृत्तांत, व त्याचे विविध चॅनलद्वारे प्रसारण यासाठी 24.33 रुपये खर्च करण्यात आले.

(18) शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे 2 जून व तिथी प्रमाणे 6 जून रोजी साजरा करण्यात आला. यासाठी 5 व 6 जून 2023 रोजी व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रण ड्रॉनद्वारे करणे यासाठी 3 लक्ष रुपये असा 45 लाख 16 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणुका लढवायच्या, राज्य कारभार चालवायचा, तसेच प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाषणाची सुरुवात करायची, मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्या यंत्रणांनी आपापली कामे इमानीतबारे पार पाडली, त्या एजन्सी धारकांच्या कामांची बिले अदा करण्याची वेळ आली, तेव्हा राज्यकर्त्यांसहित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने दाद कोणाकडे मागायची? असा सवाल संबंधित एजन्सी धारक व ठेकेदार करीत आहेत. आपल्याकडे असणारे सोने – नाणे गहाण ठेवून तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इमान इतबारे काम केले. मात्र, आता चार महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एक रुपया देखील देण्याचे नाव राज्य शासनामध्ये बसलेले राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी घेत नसल्याने ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

याबाबत महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता, ते म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान ज्या एजन्सी धारकांनी कामे केली आहेत, त्यांची बिले अदा करण्यासंदर्भातला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काम करणाऱ्या एजन्सीधारकांना शासनाकडून 9 लक्ष रुपये अदा करण्यात आले होते. त्यातील रक्कम प्रत्येक एजन्सी  धारकांना थोड्याफार प्रमाणात वाटप करण्यात आली आहे. यापुढे देखील शासनाकडून पैसे अदा झाल्यानंतर येणाऱ्या पैशातून प्रत्येक एजन्सी धारकांना पैसे अदा करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

महाडचे उपविभागीय दंडाधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी संगीतले की, ते जिल्हा नियोजन अधिकारी मेहेत्रे यांच्याशी वारंवार संपर्कात असून शासनाकडे देखील स्वतःहून याबाबत पाठपुरावा करीत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान काम करणाऱ्या ठेकेदारांना येत्या आठवडाभरात काही रक्कम शासनाकडून मिळेल, असे बानापुरे यांनी सांगितले

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात