मुंबई : महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “फुले” हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, तसेच सह-निर्माते रोहन गोडांबे यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विशेष भेट घेतली.
या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “महात्मा फुले यांच्यावर याआधी आचार्य अत्रे यांनी १९५५ मध्ये चित्रपट तयार केला होता. काही वर्षांपूर्वी ‘सत्यशोधक’ चित्रपटही आला. मात्र आता ‘फुले’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे कार्य देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल.”
त्यांनी पुढे सांगितले, “महात्मा फुले यांना त्यांच्या काळातील कर्मठ मानसिकतेचा सामना करावा लागला, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. मात्र, त्याच काळात ब्राह्मण समाजातील काही सुज्ञ व्यक्तींनीही त्यांना साथ दिली. भीडे, भवाळकर यांसारख्या लोकांचा उल्लेखही या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची मांडणी वस्तुनिष्ठ आणि समतोल आहे.”
छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सर्वच समाजातील काही कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांनी फुल्यांना विरोध केला, तसेच सर्वच समाजात काही सुजाण व्यक्तींनी त्यांना साथही दिली. त्यामुळे हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट समाजाला बदनाम करण्यासाठी नाही, तर महात्मा फुल्यांचे खरे कार्य समजून घेण्यासाठी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा, त्याला शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत.”
चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले, “सिनेमॅटिक लिबर्टी घेणे ही प्रत्येक चित्रदिग्दर्शकाची शैली असते, मात्र या चित्रपटात आम्ही शक्य तितक्या प्रमाणात ऐतिहासिक सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक पुस्तकांचा आणि उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा सखोल अभ्यास करूनच ‘फुले’ चित्रपट तयार करण्यात आला आहे.”
‘फुले’ हा चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याचा प्रामाणिक दस्तऐवज ठरण्याची शक्यता असून, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.