मुंबई
मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रूपये जमा करीत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हफ्ते दिले जात आहेत. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
डान्सबार पहाटेपर्यंत चालू आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलीसांकडे तक्रार देऊन देखील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याउलट सिंडिकेटमधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देत आहेत, मारहाण करीत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील ऑर्केस्ट्राच्याआड सुरू असलेल्या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात २००५ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बंद केलेले डान्स बार २०१९ पासून सुरू झाले. त्याआधी केवळ मुंबईत ७०० डान्स बार होते; त्यापैकी जवळपास ३०० बार बेकायदा असल्याचे तेव्हाच्या अहवालातून स्पष्ट होते. त्याशिवाय मुंबईवगळता अन्य शहरांत ४०० बारची नोंद होती. त्या काळात जेमतेम एक हजार डान्स बारमध्ये सुमारे ७५ हजार महिला काम करीत असल्याचेही आकडे तेव्हा होते. त्यानंतर राज्य सरकारने २०१६ मध्ये डान्स बारबाबतचे नियम कडक केले; मात्र १७ जानेवारी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठविली. त्यात गेल्या साडेतीन-चार वर्षांत डान्स बारची संख्या वाढत गेली. त्यातून बेकायदा बारही थाटले गेले.