मुंबई
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातही यावरून संताप आहे. शिंदे गटाच्या ७ मंत्र्यांनी सोमवारी या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड प्रकरण भाजपला तापदायक ठरणार आहे.
गोळीबाराची घटना घडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेश गायकवाड यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले. या प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारण होत असल्याची माहिती आहे. गायकवाडांवर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. कल्याण, डोंबिवलीमधील राजकारण तापले आहे. त्याचबरोबर नेटीजन्स आक्रमक झाले आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांचे समर्थक रिल्स करुन सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
वादाचं कारण काय?
जमिनीवरुन महेश आणि गणपत गायकवाड यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काहींच्या मते हा वाद राजकीयसुद्धा आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हे या वादाचं कारण आहे. या मतदारसंघात पंधरा वर्षांपासून विद्यामान भाजप आमदार गणपत गायकवाड यांची सत्ता आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरु झाली. त्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड प्रयत्न करत आहेत, असंही म्हटलं जात आहे. शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. यामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ आहेत, अशी चर्चा आहे.