X: @ajaaysaroj
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेत असला तरी, जागावाटपावर नजर टाकल्यास त्यांच्या नशिबी गोटा आला आहे. अंतिम जागा वाटपात ऐतिहासिक महाफुटीची झळ सोसलेले प्रादेशिक पक्ष शिवसेना उबाठा गट २१ जागा व शरद पवार गट १० जागा लढवत असताना देशपातळीवरील अखंड काँग्रेसवर अवघ्या १७ जागा लढवायची नामुष्की आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार, असंख्य नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडले. जेमतेम एका हाताच्या बोटावर आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी शिवसेना उबाठा गटामध्ये राहिले. मात्र संजय राऊत यांच्या आक्रमकपणामुळे व उद्धव ठाकरे यांच्या धुर्तपणामुळे उबाठा गट, जागावाटपामध्ये आपल्या पदरात जास्तीतजास्त जागा पाडून घेऊ शकला.
काँग्रेसला अक्षरशः वेठीस धरून, उबाठा गटाने त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला जागावाटपात पाने पुसली आहेत. अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अशीच फोडली. शरद पवार यांच्याकडे आजमितीला मोजकेच आमदार आणि लोकप्रतिनिधी राहिले आहेत. मात्र तरीही संजय राऊत यांनी शरद पवार यांना विश्वासात घेऊन काँग्रेसला जागावाटपात त्यांची किंमत दाखवून दिली आहे. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरे हे अत्यंत चलाखीने नामानिराळे राहिले आहेत. पवार – राऊत या जोडगोळीने जागावाटपात प्रादेशिक पक्षांचे महत्व निर्विवादपणे जपले आहे हे मान्य करावेच लागेल. संजय राऊत आणि शरद पवार यांनी संगनमताने वर्धा, सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या हक्काच्या जागा काँग्रेसकडून उबाठा आणि शरद पवार गटासाठी हिसकावून घेतल्या आहेत हे अंतिम यादी नजरेखाली घातली की लक्षात येते.
सांगलीमध्ये तर काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून चारवेळा दिल्ली वाऱ्या केल्या. के सी वेणूगोपाल, मुकुल वासनिक यांच्यापासून सर्व वरिष्ठांचे उंबरे झिजवले, पण राज्यातील नेतृत्वाने लाल झेंडा दाखवलेला असल्याने दिल्लीमध्ये कदमांना तसेच झुलवत ठेवण्यात आले. तर इकडे संजय राऊत यांनी कदमांच्या नाकावर टिच्चून सांगलीत सभा घेतली, वर जाहीरपणे कदमांनी आणि त्यांच्या मूठभर लोकांनी, नौटंकी बंद करावी असा सज्जड दम पण दिला. या नौटंकीबाजांचे विमान पायलट चुकीचा असल्याने कदाचित गुजरातमध्ये उतरेल अशी खिल्ली पण त्याच व्यासपीठावरून उडवली आणि असे छप्पन कदम उबाठा गट खिजगणतीतही पकडत नाही हे दाखवून दिले. तीच गत राऊत आणि उबाठा गटाने मुंबईतील जागास्वतःकडे खेचून घेताना काँग्रेसची केली.
माजी मंत्री व मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना पण राऊत यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वर्षाताईंनी काँग्रेससाठी त्यांच्या हक्काच्या मुंबईतील जागा मागितल्या होत्या. पण दक्षिण मध्य मुंबईत उबाठा गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी देऊन मुंबई काँग्रेस अध्यक्ष असलेल्या गायकवाड यांचाच पत्ता कट केला. मुंबईसारख्या ठिकाणच्या अध्यक्षाचा पत्ता पण उबाठा गट कापू शकते असे दाखवत काँग्रेस आणि त्यांचे राज्य नेतृत्व कसे उबाठाच्या ताटाखालची मांजर झाली आहे हे दाखवून दिले. उत्तर पश्चिम मतदारसंघात तर जागावाटप चर्चा सुरू व्हायच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी खिचडी वाटप प्रकरणातील आरोपी, अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करून निष्ठावान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. पक्षाशी निष्ठा कायम ठेवून गायकवाड यांनी या सर्व अपमानास्पद वागणुकीला राज्यातील नेतृत्व जबाबदार असल्याची खंत व्यक्त केली आहे. पण माजी अध्यक्ष व खासदार संजय निरुपम, प्रदेश सरचिटणीस डॉ राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तिकडे सांगलीत उमेदवारी परत काँग्रेसकडे येईल म्हणून विश्वजीत कदम अजूनही देव पाण्यात घालून बसले आहेत, पण आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे हे त्यांनी मनोमन ओळखले आहे.
नेतृत्व कर्तृत्वहीन, कणाहीन आणि फक्त वाचाळ असले की काय होते याचे उदाहरण म्हणजे राज्यात काँग्रेसच्या नशिबी आलेला जागावाटपातील गोटा आहे हे लक्षात येते. म्हणूनच, असे नेतृत्व म्हणजे पक्षाचा दफनविधी करून पक्षाला वाहिलेली श्रद्धांजली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खासदार व अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे.