१४० उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागले !
X : @Rav2Sachin
मुंबई: मुंबई अग्निशमन दलात अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील मोठी माहिती Rajkaran.com च्या हाती लागली आहे. या माहितीतून स्पष्ट होत आहे की, रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची अग्नीशामकपदी नियुक्ती करण्यात आलेले नाही.
यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade Department) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधून वारंवार प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही यासंबंधी प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याशी बोलण्यास सांगितले.
अग्निशामक पदाच्या (Firefighter) रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीचा (waiting list) उपयोग करण्यात न आल्याने 140 उमेदवारांना नोकरी पासून मुकावे लागले आहे. यामध्ये त्यांची कोणतीही चुक नसताना त्यांना त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागल्याने ते त्यांच्या कुटुंबांचे पालन कसे करणार? याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे कोणी ही आज गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही आणि यावर बोलण्यासही टाळत आहेत.
Rajkaran.com चे आमचे पत्रकार सचिन उन्हाळेकर यांनी अग्निशामक भरती (recruitment) संदर्भातील माहिती, माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे. यातून 140 उमेदवारांना अग्निशामक पदाच्या नोकरी पासून मुकावे लागल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या अंतर्गत मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील अग्निशामक या संवर्गातील 910 रिक्त पदे भरण्याकरिता तत्कालीन आयुक्त यांनी (क्र. एमजीसी / एफ/ 7801 दि. 30.09.2022 अन्वये) मंजूरी दिली होती. त्यानुसार, रिक्त पदे भरण्याची संक्षिप्त जाहिरात दि. 29.12.2022 रोजी विविध वर्तमानपत्रात व संपूर्ण जाहिरात मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. यानंतर अग्नीशामक पदाची भरती प्रक्रिया दि. 13.01.2023 ते 14.02.2023 या कालावधीत दहिसर पश्चिम येथील लोकनाथ गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) येथे आयोजित करण्यात आली होती. या भरतीत एकूण 42,534 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 24,053 उमेदवार अपात्र ठरले व 18,481 उमेदवार संपूर्ण भरती अंतर्गत पात्र ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात आली. ही यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
दरम्यान, निवड यादीतील जे उमेदवार वैद्यकीय तपासणीकरीता हजर होणार नाहीत अशा उमेदवारांच्या जागी गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवार घेण्यात यावे, त्याकरिता प्रतीक्षा यादी बनविण्यास व ही प्रतिक्षा यादी तत्कालीन आयुक्त यांच्या मंजुरीच्या दिनांकापासून सहा महिन्यापर्यंत वैध ठरेल, असे अभिप्राय देण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त यांची या प्रस्तावास (क्र. एमजीसी/ एफ/7801 दि. 08.05.2023 अन्वये) मंजूरी प्राप्त झाली होती.
तत्कालीन आयुक्त यांच्या मंजुरी अन्वये अग्नीशामक पदाच्या एकूण रिक्त पदांच्या 30 टक्के प्रवर्ग निहाय एकूण 277 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली होती. प्रतीक्षा यादीचा हा प्रस्ताव तत्कालिन प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी तयार केला होता. या प्रस्तावावर तत्कालीन सह आयुक्त (सुधार), अतिरिक्त आयुक्त यांच्या स्वाक्षरीने मंजूरी मिळाली होती. या प्रस्तावाची झेरॉक्स प्रत Rajkaran.com कडे उपलब्ध आहे.
अग्नीशामक या संवर्गातील 910 रिक्त पदांपैकी 37 पदे दिव्यांगकरीता आरक्षित असेल तरी दिव्यांग आरक्षण लागू होणार नाही, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे अग्नीशामक पदाच्या 910 जागा मधून दिव्यांग पदाच्या 37 जागा वगळून 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी करण्यात आलेली होती. त्यात अग्नीशामक पदाच्या एकूण रिक्त पदांच्या 30 टक्के प्रवर्ग निहाय एकूण 277 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. पण प्रतीक्षा यादीच्या सहा महिन्यांच्या कालावधी नुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये प्रतीक्षा यादी नियमाने रद्द झाली.
या प्रतीक्षा यादीतील किती उमेदवारांची अग्नीशामक पदी नियुक्ती करण्यात आली, यासंबंधी प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांना विचारले असता त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, संजय मांजरेकर हे जून 2023 मध्ये सेवानिवृत्त झाले. यानंतर प्रमुख अग्निशमन अधिकारी पदी रविंद्र आंबुलगेकर यांची नियुक्ती झाली.
अग्नीशामकपदी आतापर्यंत एकूण 733 उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे, असे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) माहिती मिळालेली आहे. जर 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी करण्यात आली होती, आणि 733 उमेदवारांची अग्नीशामक पदी नियुक्ती झाली तर उर्वरित 140 जागांवर अग्नीशामक पदी नियुक्ती का करण्यात आली नाही? तसेच जर 140 जागा रिक्त होत्या तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन त्यांना अग्नीशामक पदी का नियुक्त करण्यात आले नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. खरच अग्नीशामक पदाच्या 140 जागा रिक्त आहेत का, हे जाणून घेण्याकरिता प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांना विचारले असता, त्यांनी मागील दहा दिवसांपासून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनाच विचारा, असे उत्तर दिलेले आहे. आंबुलगेकर यांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, संबधित प्रकरणाची माहिती भरती प्रक्रिया विभागाकडून घेऊन देतो. मात्र दहा दिवसांपासून ते कोणतेही माहिती आणि प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.