Twitter : @therajkaran
धुळे
धुळे जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयुक्तीक पथकाने आज दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळलेल्या दुध विक्रेत्यावर कारवाई केली असल्याची माहिती दूध भेसळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ही कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, निरिक्षक वैधमापन शास्त्र आर. सी. पाटील, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील पशुधन पर्यवेक्षक चिन्मय सोनवणे, विस्तार संकलन, प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, शासकीय दुध योजना, धुळेचे विजय भदाणे, तसेच पोलीस प्रशासनातील त्या-त्या परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही तपासणी केली.
धुळे शहरातील देवपूर पश्चिम भागातील नकाणे रोड, वाडीभोकर रोड, तुळशिराम नगर इत्यादी परिसरात दूध विक्री संकलन करून विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांच्याकडील दूधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली. या कारवाईत एकुण 6 दूध विक्रेत्याच्या एकुण सरासरी 251 लीटर दूधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची कार्यवाही स्थळी तपासणी केली असता, त्यापैकी एकूण 5 दूध विक्रेत्यांच्या काही दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास चव, कचरा, अस्वच्छता आढळून आली.
भेसळ आढळून आलेले सरासरी एकुण 131 लीटर (गाय दूध 36 लीटर, म्हैस दूध 95 लीटर) दूध नष्ट करण्याची कारवाई तात्काळ करण्यात आली. तसेच वाडीभोकर रोड येथील साईकृष्णा दुग्धालय यांचेकडील दूधाची तपासणी करण्यात आली असता पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास आढळुन आल्याने त्यांच्याकडील भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. परंतु तेथे ३-४ त्रयस्त व्यक्तींनी समिती सदस्य व सोबत शासकीय कर्मचारीसमवेत चुकीचे आरोप करुन मारहाण करण्याची धमकी व भांडणसदृष्य परिस्थिती निर्माण केली असता त्यांच्याविरुध्द भादंवि कलम १८८, १८६, २७२, ५०४, ३४, ५०६ अन्वये देवपुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यांत आला आहे.
त्याच प्रमाणे आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शहरी परिसरात दूध विक्री संकलन करुन विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांचेकडील दूधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाव्दारे करण्यांत आली. या धडक कारवाईत एकुण 6 दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांच्या एकुण सरासरी 623 लीटर दूधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची कार्यवाहीस्थळी तपासणी केली असता, त्यापैकी एकुण 3 दूध विक्रेत्यांच्या काही दूधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास चव, कचरा, अस्वच्छता आढळुन आलेली आहे. भेसळ आढळून आलेले सरासरी एकुण 73 लीटर (म्हैस दूध 73 लीटर) दूध नष्ट करण्याची कारवाई तात्काळ करण्यांत आली.
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत न्यु खेतेश्वर स्वीट्स, साक्री यांचेकडील दुग्धजन्य पदार्थाचे 2 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आलेले आहे. वैध मापनशास्त्र विभाग, धुळे यांच्या सोबत संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांचे मुद्रांकनाची पडताळणी करण्यांत आली असता, 03 दूध विक्रेत्यांच्या डेअरीतील / वापरातील वजन-मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन आढळुन आल्याने वैध मापनशास्त्र अधिनियम 2009 अंतर्गत खटले नोंदविण्यांत आले आहेत.
दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणे व भेसळ नियंत्रण मोहिमेस मज्जाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दूध भेसळ नियंत्रण समितीची घड़क कारवाई अविरत सुरू राहणार आहे. त्यामुळे दूध पुरवठादार व दूध विक्रेत्यांनी पाणी किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता, स्वच्छ दूध हाताळणी व स्वच्छ कार्यपध्दतीचा अवलंब करुन विनाभेसळ दूध वितरण करावे. भेसळयुक्त / दुषीत दूध व दुग्धजन्य खाद्यपदार्थाद्वारे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यांस भविष्यात दंडनिय व कायदेशीर करवाईस सामोरे जावे लागेल, असेदूध भेसळ नियंत्रण समितीच्या पथकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.