Twitter : @NalavadeAnant
मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर इंडिया आघाडीचे जागावाटपाच्या प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होईल.
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP – Sharad Pawar faction) या तीन पक्षात चर्चा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या तीन अशा नऊ जणांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), बसवराज पाटील (Basavraj Patil) आणि नसीम खान (Naseem Khan), शिवसेनेकडून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), विनायक राऊत (Vinayak Raut) आणि अनिल देसाई (Anil Desai) तर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीची ही समिती जागा वाटपासंदर्भात चर्चा करून जागा वाटपाचा (seat sharing between INDIA allaince) तिढा सोडवणार आहे. कोणत्या पक्षाकडे कोणता मतदारसंघ गेल्यास विजयाची शक्यता अधिक आहे हा निकष समोर ठेवून ही समिती जागा वाटपावर चर्चा करेल. लोकसभा निवडणुकीच्या (LOk Sabha elections 2024) तयारीला वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.
तीनही पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेच्या जागा वाटपात प्रचंड रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण हे तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र लढविणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या खासदारांचा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरवताना या समितीची कसोटी लागणार आहे.