धुळे : – धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात आंबेडकरी संघटनांनी आज शहरात मोर्चा काढला. सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात आला.
मोर्चात विविध आंबेडकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. शासकीय कर्मचारी सुरेश पाईकराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शिंदखेडा येथील वाळू माफियांनी पत्रकार जतन नगराळे यांच्यावर केलेल्या हल्ल्याची चौकशी करून कारवाई करण्याचेही आवाहन करण्यात आले.
मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी युवक आणि महिलांचा सहभाग होता. सामाजिक कार्यकर्त्या पूनम शिरसाठ यांनी सांगितले की, “सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पोलिसांवरही कारवाई न झाल्यास या आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल.”
या मागण्यांवर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.