महाड : – भोर-वरंधा घाटात उंबर्डेवाडी (ता. भोर) येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने मारुती कंपनीची इको कार (MH 12 UJ 9957) ५०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात एक जण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडला.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील जनता वसाहतीतील शुभम शिर्के (वय २२) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये मंगेश गुजर (वय २६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९, भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने (वय २६, दांडेकर पूल), सौरभ महादे (वय २२, पर्वती), गणेश लावंडे (वय २७, धायरी), अभिषेक रेळेकर (वय २५, नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२, घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर (वय २५, दत्तनगर) यांचा समावेश आहे.
#Watch : Mahad : भोर-वरंधा घाटात इको कारचा भीषण अपघात; ५०० फूट दरीत कोसळून एक ठार, आठ जखमी. पुण्यातील जनता वसाहतीतील शुभम शिर्के (वय २२) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. वाहनावरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.#Mahad #RoadAccident @RaigadPolice pic.twitter.com/qH9Eur56PT
— rajkaran (@therajkaran) January 27, 2025
भोर पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. मृतदेह आणि जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघाताची नोंद भोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनिल चव्हाण, सागर झेंडे यांच्यासह वारवंडचे पोलीस पाटील सुधीर दिघे आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्यात योगदान दिले.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसून, वाहनावरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.