मुंबई – एसटी भाडेवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतलेला नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाडेवाढीला विरोध केला आहे. मग ही दरवाढ झालीच कशी?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “जर दरवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर सरकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? हा सरकारचा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत-जंमत सुरू असून, चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी मंत्री पुढे येतात, पण निर्णय अंगलट आला की अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलतात. ही दुटप्पी भूमिका जनतेच्या हिताच्या विरोधात आहे.”
#Watch : एस टी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतलेला नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाडेवाढीला विरोध केला आहे. मग ही दरवाढ झालीच कशी?” विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते यांचा सवाल.
— rajkaran (@therajkaran) January 27, 2025
#STFareHike
@PratapSarnaik
@AjitPawarSpeaks @VijayWadettiwar pic.twitter.com/foyHpU3PFn
त्यांनी पुढे म्हटले की, “जर मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दरवाढीला विरोध असेल, तर ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत. या खात्याचा खरा वाली कोण आहे, हे स्पष्ट व्हावे.”
दरम्यान, एसटी भाडेवाढीमुळे सामान्य जनतेवर वाढलेल्या आर्थिक ताणाचा मुद्दा विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.