नवी मुंबई : घणसोली येथील महालक्ष्मी अपार्टमेंट या धोकादायक इमारतीत वीज पुरवठा सुरू ठेवून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सरकारी फसवणूक केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कालीपुत्र डॉ. सचिन कदम यांनी केला आहे. या प्रकरणात नवी मुंबई महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमीन मालक व विकासकांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत कदम यांनी बेलापूर महापालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
डॉ. कदम यांनी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला असून, वीज मीटर एकाच ठिकाणी असूनही मागील चार वर्षांपासून वीज पुरवठा सुरू ठेवला जात आहे. प्रलंबित वीज बिल आणि सरकारी कर न भरल्याने लाखोंची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, महापालिकेतील कर अधिकाऱ्यांवर आणि घणसोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्यावरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. कदम यांनी एमआयडीसी महापेतील भ्रष्टाचारावरही लक्ष वेधत सावकार, कळसकर, आणि राठोड या अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी केली आहे.
डॉ. कदम यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत उपोषणादरम्यान त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. “जोपर्यंत नवी मुंबईकरांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असे ठाम मत व्यक्त करत प्रशासनावरील दबाव वाढवला आहे.
या प्रकरणात महापालिका आणि पोलीस विभाग काय भूमिका घेतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.