Twitter: @therajkaran
मुंबई
सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad Pawar) निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सिनियर पवारांच्या राष्ट्रवादीची “रसद” तोडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असाही सवाल विचारण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांचा सत्तेत सहभाग, सातत्याने अजित पवार आणि शरद पवार meeting between Ajit Pawar and Sharad Pawar) यांच्या होत असलेल्या भेटीगाठी, शरद पवारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत (NDA) आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि शरद पवारांची भाजपासोबत न जाण्याची ठाम भूमिका, याचा या ईडीच्या कारवाईशी संबंध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ज्वेलर्सच्या कारभारात अनियमितता
ईडीनं या कारवाईत 1 कोटींची रोख रक्कम आणि 39 किलो सोनं जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. या दागिन्यांची किंमत 25 कोटी रुपये आहे. ईडीनं जेव्हा ही कारवाई केली, त्यावेळी सोन्याचं मोठं घबाड हाती लागेल, अशी आशा ईडीला होती. प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही. 1300 किलो सोन्यापैकी केवळ 40 किलो सोनंच ईडीच्या हाती लागलेलं आहे.
ईडीनं कारवाईपूर्वी इश्वरलाल जैन यांच्या संपत्तीचा मागमूस काढलेला होता. त्यांच्या 3 ज्वेलरी कंपन्यांमधून खोट्या व्यवहारांच्या नावाखाली अफरातफर करण्यात आल्याचा संशय ईडीला होता.
जैन यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा
या प्रकरणात राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर एल गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या तीन कंपन्या आणि या कंपन्यांचे प्रवर्तक राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन (Former NCP Rajya Sabha member Ishwarlal Jain), माजी आमदार मनीष जैन आणि त्यांच्या परिवारीतल इतर सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या आरोपींनी स्टेट बँकेंतून 353 कोटींचं कर्ज घेतले. मात्र त्याचे हप्ते चुकवले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. सीबीआयनं (CBI) दाखल केलेल्या या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनं इश्वरलाल जैन यांच्याविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवलेला आहे.
केवळ 40 किलोच सोनं मिळाले
बँकेतून कर्ज घेताना लखीचंद ज्वेलर्स यांनी आपल्याकडे 1284 किलो सोनं असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ईडीनं केलेल्या कारवाईत त्यातील केवळ 40 किलो सोनंच हाती लागलेलं आहे. खोटे खरेदी आणि विक्रीचे व्यवहार दाखवून बँकेकडून घेण्यात आलेल्या 353 कोटींची अफरातफर करण्याता आल्याचं ईडीचं म्हणणे आहे. हे एवढं मोठं कर्ज कुणाला देण्यात आले याची कोणतीही माहिती वा कागदपत्रं या तिन्ही कंपन्यांचे प्रवर्तक सादर करु शकलेले नाहीत. यातून जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ईश्वरलाल जैन काय म्हणाले?
सीबीआयकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) तक्रार दिल्यानंतर, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर ईडीनं कारवाई करणं हे अपेक्षितच होतं, असं इश्वरलाल जैन म्हणाले आहेत. ईडीचे अधिकारी येतील याची कल्पना होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं. मात्र ज्या शोरुममध्ये दागिने जप्त करण्यात आले, त्यावर आक्षेप असल्याचं त्यांनी सांगितले. ही जप्तीची कारवाई बेकायदेशीर असल्याचार दावा इश्र्वरलाल जैन यांनी केला आहे.
ज्या 3 कंपन्यांवर आणि चौघांवर एफआयआर दाखल केलेले आहेत, त्यांचा कारवाई झालेल्या ज्वेलरी दुकानाशी संबंध नाही, असही त्यांनी सांगितले. हे दुकान मनिष जैन यांच्या दोन मुलांच्या नावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एसबीआयकडून घेतलेलं कर्ज हे सोन्याचं कर्ज होतं, ते 4 टक्क्यांनी घेतले होतं. त्यानंतर हे गोल्ड लोन रद्द करुन 18.50 टक्के व्याजानं कर्ज आकारणी करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कराच्या स्वरुपात एसबीआयनं आपल्याकडून 80 कोटी रुपये जास्त घेतल्याचा आरोपही इश्वरलाल जैन यांनी केला आहे. तसंच व्याजही वसूल करण्यात येत होतं. त्यात तोटा सहन करावा लागला, त्यामुळे कर्जफेड करू शकत नव्हतो, असंही जैन यांनी स्पष्ट केलंय.
ते म्हणाले, कर्जाची पुनर्रचना (restructure of loan) करून परतफेडीचा कालावधी 9 वर्ष करा, अशी विनंती केली होती. 2003 साली घेतलेलं कर्ज 2014 पर्यंत सुरु होतं. ते पुढं 9 वर्ष अजून जाऊ शकलं असते, मात्र बँकेनं प्रस्ताव फेटाळला असा दावा जैन यांनी केला. ते म्हणाले, यात सेटलमेंट हा मार्ग होता. मात्र अंबरीश जैन या जामीनदाराच्या भूमिकेमुळं तेही होऊ शकलेलं नाही.
ही कारवाई राजकीय हेतून (political vendetta) प्रेरित असल्याची चर्चा आहे, मात्र जोपर्यंत आपल्याकडे पुरावे येत नाही तोपर्यंत याबाबत बोलणार नाही, पुरावे आल्यानंतर याबाबत पत्रकार परिषद घेईन, असेही इश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे. आपण आजही शरद पवारांच्या पाठिशी आहोत आणि त्यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न?
राष्ट्रवादीचे खजिनदार पद सांभाळणाऱ्या आणि माजी खासदार असलेल्या इश्वरलाल जैन यांच्यावर ईडीनं केलेली ही कारवाई राजकीय उद्देशानं केली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत बंड घडवून आणत अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे विश्वासू साथीदार भाजपानं फोडले. मात्र, यात शरद पवारांनीही एनडीएसोबत यावं अशी त्यांची इच्छा असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीगाठीत भाजपासोबत न जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. इतकंच नाही तर मविआ (MVA) आणि इंडियाला (INDIA) उर्जा देण्यासाठी वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्रात दौरे करतायेत. लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांची भूमिका भाजपा आणि महायुतीला (political loss of BJP and Mahayuti) तोट्याची ठरेल. महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपानं केलेला आहे. अशा स्थितीत शरद पवार एनडीएसोबत यावेत, यासाठी दबावतंत्र तर वापरण्यात येत नाहीये ना? अशीही चर्चा सुरु आहे.