महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan :साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातो; मराठी शाळा बंद करू नका – संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात पानिपतकार विश्वास पाटील यांनी मराठी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीबाबत कळकळीची भूमिका मांडली. “साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतो. कर्नाटकात एखाद्या शाळेत एकच विद्यार्थी असला तरी कन्नड शाळा सुरू राहते; महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करू नका,” अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

मराठी ही मानवी मूल्यांची भाषा – मुख्यमंत्री फडणवीस

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी संस्कृती नदीसारखी वाहती आहे. मराठी ही मानवी मूल्यांची भाषा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळून राजमान्यता मिळाली आहे; आता देशभर लोकमान्यता मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे.” महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती असेल, इतर कोणत्याही भाषेची नाही, असे स्पष्ट उद्गारही त्यांनी काढले.

मराठी म्हणजे अर्धनारी नटेश्वर – मृदुला गर्ग

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विचारवंत मृदुला गर्ग यांनी मराठी साहित्याचा गौरव करताना सांगितले की, “स्त्री आणि पुरुष दोघांनाही साहित्यातून न्याय देणारी मराठी भाषा अर्धनारी नटेश्वरासारखी भासते. या मराठीला कोटी-कोटी प्रणाम.”
मराठीचे अध्यापन प्राथमिक स्तरापासून व्हावे, तरच वाचक, हितचिंतक आणि लेखक घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

९९व्या संमेलनाची थाटात सुरुवात

दिल्ली येथे झालेल्या ९८व्या साहित्य संमेलनानंतर ९९वे संमेलन कुठे होणार याची चर्चा संपूर्ण मराठी विश्वात सुरू होती. तब्बल ३३ वर्षांनंतर सातारा येथे पुन्हा साहित्य संमेलन भरत असून, यापूर्वी येथे ६६वे संमेलन झाले होते.

९९वे संमेलन असल्याने ९९ शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने ‘खरा एक तो एकची धर्म’ (साने गुरुजी) आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सामूहिक गायनाने संमेलनास वैभवशाली प्रारंभ झाला.

सातारा ही रत्नांची खाण – विश्वास पाटील

अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील म्हणाले, “सातारा ही रत्नांची खाण आहे.” पठ्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे, गदिमा, बालगंधर्व, रामदास स्वामी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कर्मवीर भाऊराव पाटील, बा.सी. मर्ढेकर, दत्ताजी शिंदे, रंगो बापू गुप्ते, गोविंद वल्लभ पंत, कवी गिरीश, पी. सावळाराम, उपराकार लक्ष्मण माने यांचा त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला.

“ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी २३ व्या संमेलनाध्यक्षपदावरून भाषेचा पुरस्कार केला. खरा साहित्यिक लेखनस्वातंत्र्यासाठी तुरुंगातही जायला तयार असतो,” असे सांगत त्यांनी मजरुह सुलतानपुरी आणि बा.सी. मर्ढेकर यांची उदाहरणे दिली.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही ग्रंथ चळवळीला घरघर का? असा सवाल उपस्थित करत, राज्यात ललित साहित्याची फक्त ३५ दुकाने असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयात माफक दरात मराठी साहित्य उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.

राजकारण साहित्याबाहेरच राहावे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’ कादंबरीचा प्रभाव आजही टिकून आहे. दिल्लीत जेएनयूमध्ये मराठी अध्यासन निर्माण करू शकलो, याचा अभिमान वाटतो.”
साहित्यिकांनी राजकारणात यावे, पण साहित्यात राजकारण येऊ नये, अशी कोटीही त्यांनी केली.

दलित साहित्य प्रेरणादायी – मृदुला गर्ग

नामदेव ढसाळ, मल्लिका ढसाळ यांच्या साहित्यात वेदनेचे तांडव दिसते. दिलीप चित्रे, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांचा त्यांनी उल्लेख केला.

लोकसंस्कृती म्हणजे समूहसंस्कृती – तारा भवाळकर

९८व्या संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर म्हणाल्या, दिल्लीतील भाषण हा समूहमनाचा आवाज होता. मराठी माणूस जिथे गेला, तिथे संस्कृती रुजवली. प्रकृती टिकली तरच आपण टिकणार, असे त्या म्हणाल्या.

ही स्वप्नपूर्ती – शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा येथे साहित्य संमेलन व्हावे हे स्वप्न होते. अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन आहे. सातारा सांस्कृतिक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी ‘अटकेपार’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष मिलिंद जोशी आणि संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात