ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

अखेर नाराजी कामी आली; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याची “सुभेदारी”

Twitter @NalavadeAnant

मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेखातर सतेत सहभागी होऊनही केवळ पुण्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी रुसून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी मारली. त्यामुळे हादरलेल्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांनी बरीच चर्चा करत अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याची सुभेदारी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी हा निर्णय येथे जाहीर केला.

सत्तेत सहभागी होऊनही अजित पवार गटाच्या कोणत्याही मंत्र्यांकडे थेट एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद न सोपवल्याने त्यांच्या मनात एक सुप्त नाराजी होती. त्याला कारणही तसेच आहे. अगदी काही महिन्यात विविध पंचायत समित्या, ग्रामपंचायती व अन्य निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मनासारख्या जागा लढवायच्या आहेत. तर स्वतःचा पक्ष स्थापन केल्याने त्याचे अस्तित्वही राखायचे आहेत.

अगदी एक वर्षावर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी जास्तीत जास्त प्रतिनिधित्व असायला हवे आणि त्यादृष्टीने जिल्ह्यांचे पालकमंत्री असणे याला एक विशेष महत्व आहे. उपमुख्यमंत्री पद मिळूनही पुण्याची सुभेदारी न मिळाल्याने अजित पवार समर्थकांमध्ये तीव्र असंतोष होता. त्याचीच परिणती म्हणजे बुधवारी मुंबईत असूनही मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. या प्रकाराने येथील राजकीय वर्तुळात अजितदादा नाराज असल्याचा वावड्यानी जोर धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवार ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नेमकी कोणतीच भूमिका कोणत्याही नेत्याने अधिकृतरित्या न मांडल्याने संभ्रमात अधिक भरच पडली.

या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस यांनी रातोरात दिल्ली गाठली. दिल्लीत बरीच चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुण्याची सुभेदारी अर्थात पालकमंत्री पद देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब तर झालेच, पण सोबतच त्यांच्या काही मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद देण्यावर सहमती झाली. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मित्रांना सांभाळून घेताना थोडासा त्याग करावा लागेल असे एक सूचक वाक्यही मंगळवारी केले होते. त्याची परिणीती आज पालकमंत्री पदांच्या यादीवरून दिसून आली. कारण ज्या कोल्हापूर व पुणे या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपातील नंबर दोनचे नेते म्हणुन ओळखले जातात त्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे दोन्ही जिल्हे काढून घेत त्यांना सोलापूर व अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बनवण्यात आले.

डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून नंदुरबार काढून तो अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील यांना बहाल करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली. तर मंत्री दिलीप वळसे पाटील यांना बुलढाण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले आणि अजित पवार यांची असणारी नाराजी दूर करण्यात शिंदे – फडणवीस यांना काही प्रमाणात यश आल्याचे बोलले जाते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात