Twitter : @NalavadeAnant
मुंबई
भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दादर वसंत स्मृती येथे पार पडली. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, सुनील राणे, मनिषा चौधरी, प्रसाद लाड आणि महामंत्री संजय उपाध्याय आदी उपस्थित होते.
यासोबतच केंद्रीय पातळीवरून देण्यात आलेले विविध उपक्रम, केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी करण्यात येत असलेले संघटनेकडून काम, मेरी माटी मेरा देश, घर घर संवाद, बुथ सक्षमीकरण अभियानाबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच प्रदेश भाजपतर्फे काढण्यात आलेल्या ओबीसी यात्रा व प्रदेशाध्यक्ष प्रवास योजनेचे नियोजन याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली, अशी माहिती संघटन मंत्री संजय उपाध्याय यांनी दिली.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जातीजाती मधला संवाद बिघडवून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सारे सुरु आहे. याबाबत कालच्या महाराष्ट्र भाजपाच्या बैठकीत आम्ही चर्चाही केली. भाजपा याबाबत संवेदनशील पणे लक्ष ठेवून असून आजच्या मुंबई भाजपाच्या बैठकीतही याबाबत चर्चा आम्ही केल्याचे शेलार यांनी सांगितले.