भाजपचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचा गंभीर आरोप
X: @ajaaysaroj
मुंबई: रेडी पोर्ट आणि मायनिंग या दोन्ही प्रकल्पात, महाविकास आघाडी उबाठा गटाचे सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव, माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी फोटो, पुरावे देखील सादर केले.
या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा, इन्कम टॅक्स, कोकण आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, या सर्वांकडे रीतसर लेखी तक्रार केली असल्याचेही डॉ राणे यांनी स्पष्ट केले. रेडी पोर्ट हे रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याच्या सीमेवर आहे. रेडी पोर्टचे सीइओ एम एन पाल, खासदार विनायक राऊत यांचा मुलगा हितेश राऊत, राऊत यांचा भाचा शैलेश परब, हिमांशू शैलेश परब व सिद्धेश विजय नाईक अशा पाच जणांचे रेडी पोर्टवर पाहणी करत असतानाचे काही फोटो डॉ राणे यांनी पत्रकारांसमोर सादर केले.
रेडी पोर्टचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट खासदार राऊत यांनी, त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आपला मुलगा हितेश व भाचा शैलेश यांना मिळवून दिले असून, ही कंत्राट त्यांच्या मुलांनी, नातेवाईकांनी घ्यावीत, किंवा अन्य कोणी घ्यावीत याबद्दल आपला आक्षेप नसून खासदारकीचा, त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल आक्षेप असल्याचे डॉ राणे यांनी स्पष्ट केले. असाच प्रकार खासदार राऊत यांनी मायनिंग प्रकल्प कंत्राटाबाबत केल्याचाही राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विनायक राऊत यांनी आपली खासदारकी गेली दहा वर्षे फक्त मुलाबाळांना, नातेवाईकांना, कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळवून देण्यासाठीच वापरली असून, गेल्या दहा वर्षांत त्यांनी या मतदारसंघात काय काम केले आहे ते दाखवावे असे आव्हानही त्यांनी राऊत यांना दिले.
राज ठाकरे यांच्या नखाची सर पण राऊत यांना नसून, राज यांचे कार्यकर्ते सोडाच, पण राज यांचे जेवढे चाहते आहेत तेव्हढी विनायक राऊत यांच्या भोवती आयुष्यभर गर्दी पण जमा झाली नसेल अशी खिल्ली डॉ राणे यांनी उडवली. राज म्हणजे लवंगी फटका आहे अशी टीका खासदार राऊत यांनी काल केली होती, त्याला उत्तर देताना डॉ निलेश राणे यांनी वरील भाष्य केले.
जय भवानी या शब्दावरून उद्धव ठाकरे यांची खोट्या हिंदुत्वाची नौटंकी सुरु आहे, नवनीत राणा जेव्हा हनुमान चालीसा बोलणार होत्या तेंव्हा याच उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते असा सवाल करत, या राज्यात उद्धव यांच्या सारखा ढोंगी माणूस आजपर्यंत झाला नसेल, असे सांगत उद्धव यांचे हिंदुत्व हे सोयीचे हिंदुत्व असल्याची टीकाही डॉ निलेश राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केली. याच संदर्भात आणखी एक पत्रकार परिषद घेऊन उर्वरित पुरावे व राऊत यांच्या ऑडिओ क्लिप्स आपण त्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगितले.
सिंधूदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांची राळ उडणार हे निश्चित असून त्याचा परिणाम काय होणार हे चार जूनलाच स्पष्ट होईल.