Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी यातही सरकारने राजकारण केल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला .त्याचा पुरावा देताना वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळ (drought) जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी हा खेळ सुरू असून दुष्काळ जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दुष्काळ जाहीर केला की, सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी हा दुष्काळ जाहीर केला, असा सवालही वडेट्टीवार यांनी सरकारला केला.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडून राजकारण केले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव हा अत्यंत खेदजनक आहे. किमान सरकारने तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. परंतु सरकारने तीन पक्षाच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी घेतलेल हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असून सरकारचे शेतकऱ्यांवरचे बेगडी प्रेम आता उघड झाल्याची खरमरीत टीकाही वडेट्टीवार यांनी केला.
पीकविमा कंपन्यांचे (crop insuranc companies) लाड पुरविण्याचे सरकारचे धोरणही शेतकऱ्यांना संकटात टाकणारेच असून सरकारच्या अशा चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जाणार व पीकविमा कंपन्यांचाच फायदा होणार आहे. सरकारने राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार केली. परंतु संवेदना गमावलेल्या सरकारने शेवटी राजकारण केलेच, अशी खरमरीत टीकाही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली.