मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचे “विशेष सघन पुनरिक्षण अभियान” (Special Intensive Revision – SIR) सुरू झाले असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये या प्रक्रियेची अंमलबजावणी प्राधान्याने होत आहे. मात्र, या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश न केल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमितता दूर करण्यासाठी महाराष्ट्रालाही या प्रक्रियेत सामील करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ कायदेतज्ज्ञ बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केली आहे.
तिवारी यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला थेट सवाल करताना म्हटले की, महाराष्ट्रात लाखो डुप्लिकेट आणि तिबार नावे मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप सर्वच पक्षांकडून होत आहे. अशा परिस्थितीत शुद्ध मतदार यादी उपलब्ध होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीचा अवमान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही Special Intensive Revision तातडीने राबवून निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तिवारी यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सध्याच्या मतदार याद्या अत्यंत विवादित स्थितीत आहेत आणि या याद्यांच्या आधारे निवडणुका घेतल्या गेल्यास त्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह उभे राहील. राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या दुरुस्तीचे अधिकार नसल्याने ही जबाबदारी केंद्र निवडणूक आयोगाने स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून राज्यातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी या मागणीला समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला.
तिवारी यांनी हेही लक्षात आणून दिले की, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असले तरी चुकीच्या यादीवर ठाम राहून निवडणूक घेणे हा जनतेच्या अधिकारांवर घाला आहे. मतदार याद्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने लागले तरी ते लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चातही शुद्ध आणि अद्ययावत मतदार यादीची मागणी जोरदारपणे करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर भाष्य केले आहे. चुकीच्या याद्या वापरून राज्यात निवडणुका झाल्या तर लोकशाहीला मोठे नुकसान होईल, असे तिवारी यांनी नमूद केले असून, “आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले.

