मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १६ जून २०२५ रोजी, मोफत शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात येणार आहे. बालवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल.
वाटप करण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे इ. वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वेळेत अभ्यासासाठी ‘टॅब’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा उपक्रम २००७-०८ पासून सुरू असून, यंदा एप्रिल महिन्यातच साहित्य खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (सौ.) प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली राबवला जात आहे.
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते – मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू आणि कन्नड. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण होते व शैक्षणिक वर्षाची सुरुवात नियोजनबद्ध होते.
शालेय टॅब वापरण्याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतील. यामुळे पारंपरिक शिक्षणासोबतच डिजिटल शिक्षणाचा अनुभवही मिळणार आहे.
शाळानिहाय वाटपाचे नियोजन पूर्ण झाले असून, १६ जून रोजी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लगेच साहित्य दिले जाईल. उर्वरित विद्यार्थ्यांना ते त्यांच्या उपस्थितीच्या दिवशीच वितरित केले जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ यांनी दिली.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे यांचेही मोलाचे योगदान आहे.