मुंबई: ठाणे-घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्गाच्या निविदेत ३००० कोटी रुपयांची संशयास्पद तफावत उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रद्द करण्यात आलेल्या मूळ निविदेच्या तुलनेत नव्याने जाहीर झालेल्या निविदेत तब्बल ३००० कोटी रुपयांची कपात झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भ्रष्टाचाराचा गंभीर संशय निर्माण करणारी आहे. निविदा प्रक्रियेत संबंधित अधिकारी, सल्लागार व ठेकेदार यांच्यात संगनमत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात ॲड. मातेले यांनी पुढील मागण्या केल्या आहेत: संपूर्ण निविदा प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी. शासनास झालेल्या संभाव्य आर्थिक नुकसानीसाठी संबंधितांवर IPC व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रकरणाची ACB, CBI किंवा तत्सम स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात यावे.
ॲड. मातेले म्हणाले, “हे प्रकरण केवळ आर्थिक अपव्ययाचे नाही, तर लोकशाही व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाशी निगडित आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलली पाहिजेत.”
NAERTREGE2286428NEYHRTGE
June 6, 2025MERTYHR2286428MAYTRYR