५५ हजार कोटींचा प्रकल्प ७० हजार कोटींवर कसा पोहोचला? काँग्रेसचा सवाल
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारवर काँग्रेसने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींवर गेला, म्हणजेच १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला. यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून सरकारने यावर तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, “घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्ग व बोगदा प्रकल्पामध्ये ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सरकारला त्या प्रकल्पाची निविदा रद्द करावी लागली. अशाच प्रकारचा भ्रष्टाचार समृद्धी महामार्गातही झाला आहे. फडणवीस-शिंदे यांचे निकटवर्तीय यामधून मालामाल झाले आहेत.”
“समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच ‘५० खोके एकदम ओके’ हा खेळ उभा राहिला,” असा घणाघात करत सपकाळ म्हणाले की, “हा महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या समृद्धीचा महामार्ग आहे. शेतकऱ्यांना किती मोबदला दिला गेला, प्रत्येक पुलासाठी व किलोमीटरसाठी किती खर्च झाला, कंत्राटदारांना किती पैसे देण्यात आले, वृक्षारोपणासाठी किती खर्च झाला, आणि टोलमधून आजवर किती महसूल जमा झाला – याचा सविस्तर हिशेब श्वेतपत्रिकेत मांडला गेला पाहिजे.”
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, “महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे, अनेकांना जीव गमवावा लागला आहे, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्यांमध्ये तडे गेले आहेत. हा महामार्ग सामान्य जनतेसाठी नसून सत्ताधाऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग ठरला आहे.”
“शासनात जर थोडीशी नैतिकता शिल्लक असेल, तर या प्रकल्पावर त्वरित श्वेतपत्रिका सादर करून पारदर्शक चौकशी सुरु करावी,” अशी ठाम मागणी सपकाळ यांनी केली.