पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेचे तोरण; नेस्को मैदानात मेळावा, तर विदर्भ-मराठवाड्यात मदतकार्याला प्राधान्य
मुंबई : शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरस्थिती लक्षात घेऊन त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या.
“आम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. जनतेनेच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची खरी ताकद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत,” असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी सांगितले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले जाणार असून मदत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल. यापूर्वी कोल्हापूर आणि चिपळूण येथे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात आले होते; त्याच धर्तीवर यंदाही स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिरे उभारून पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न होतील.
“आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना” हेच आमचे धोरण असून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत आहोत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः शिंदे यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून पुढील दोन-तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर ठोस मदतीचा निर्णय होईल. “मदतीसाठीचे नियम-अटी बाजूला ठेवून तातडीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
पूरस्थितीत जमीन वाहून गेली, पशुधन व जीवितहानी झाली, अनेक घरे पाण्याखाली आहेत, अशी परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे व एमएमआरडीए परिसरातील शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून, यंदा हा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानात होणार आहे. “मेळावा घेऊन परंपरा अबाधित ठेवणार, पण मदतीचे तोरण बांधून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार,” असे शिंदे म्हणाले.