महाराष्ट्र

उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता?

X: @vivekbhavsar

मुंबई: दादरचे शिवाजी पार्क मैदान (Dadar Shivaji Park) आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे घट्ट असलेलं समीकरण शिवसैनिकांमध्ये वर्षानुवर्षे चैतन्य फुलवणारे ठरले आहे. याच शिवाजी पार्कच्या मैदानातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या गर्जनेमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) तोंडावर होणारा हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मार्गदर्शन करता येऊ नये, त्यांना मेळावाच घेता येऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याआधीच राज्यात आचारसंहिता लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचा दसरा मेळावा (Dussehra melawa) झाला नाही तरी त्यांना फार फरक पडणार नाही. मात्र, कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा दसरा मेळावा घेऊ द्यायचा नाही, त्यांच्या शिवसैनिकांना (Shiv Sainiks) मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकून घेण्याची संधी द्यायची नाही, यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. 

Also Read: कल्याण पूर्व मतदार संघावर महाविकास आघाडीतील काँग्रेससह उद्धव सेनेचा दावा 

याच रणनीतीचा (Strategy) भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दसऱ्याच्या आधीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता (election code of conduct) लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

या आधीच्या प्रस्तावानुसार 12 ऑक्टोबर रोजी  असलेल्या दसऱ्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी निवडणूक आचारसंहिता घोषित करायची, असे शासन आणि निवडणूक आयोगाचे (ECI) गणित होते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरीही सहसा सत्ताधारी पक्षाला विचारूनच निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवत असते. 

शिवसेना नेत्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून दसरा मेळावाच होऊ द्यायचा नाही आणि त्या आधीच १० किंवा ११ तारखेला निवडणूक आचारसंहिता लागू करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करायची, यासाठी शिंदे यांचे प्रयत्न आहेत.

राज्य शासनाने दोन टप्प्यात निवडणूक घ्या अशी विनंती आयोगाला केल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आयोग सहसा 35 दिवसांचा कालावधी देते. त्यानुसार दोन टप्प्यात मतदान झाल्यास ते 13 आणि 16 नोव्हेंबरला होऊ शकते आणि एका टप्प्यात मतदान (voting) झाल्यास 16 नोव्हेंबरला मतदान होईल तर मतमोजणी (counting) 20 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने  दिली.

दसऱ्याच्या आधी निवडणूक आचारसंहिता लागू झाली तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवरील मेळावा घेता येणार नाही आणि मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिक आणि राज्यातील जनतेला संदेश देता येणार नाही, याचा मोठा फटका उद्धवसेनेला खासकरून मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) बसू शकतो, असा विश्वास शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात