X: @therajkaran
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी मतदारांची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात 97 कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये 1.82 कोटी तरुण मतदार पहिल्यांदाच मत देणार आहेत. यामध्ये १८ ते २१ वयाचे मतदार हे साडे एकवीस लाख आहेत. 82 लाखापेक्षा अधिक मतदार हे 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. तसेच दीड कोटी निवडणूक अधिकारी असून देशभरात साडेदहा लाख पोलिंग बूथ असल्याची माहितीही आयुक्तांकडून देण्यात आली. तर, 55 लाखांपेक्षा अधिक EVM निवडणुकीसाठी तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.(Election Commission)
आमची टीम पूर्णपणे निवडणुकीसाठी तयार आहे. 2024 हे भारतात निवडणुकीचे वर्ष आहे. भारतातील लोकशाहीच्या या सणाकडे सर्वांचे लक्ष असते. पण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका घेणे, हे आमच्यासाठी आव्हान आहे. 16 जूनला भारताच्या लोकसभेचा (Loksabha) कार्यकाळ संपणार आहे. तर, जम्मू काश्मिर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यंदा 48 हजार तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 47.1 कोटी महिला मतदार आहेत. तर, 12 राज्यांमध्ये पुरुपांपेक्षा महिला मतदारांचे अधिक प्रमाण असून देशभरात 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणे देखील सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या Appवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळवता येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून सांगण्यात आले.
त्याशिवाय, कुठे पैसे वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.