X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीची )Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झालेली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी (Swabhimani Shetkari Sanghatana) सोडण्यात आली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने शेट्टी यांना ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढावे, यासंदर्भात विचारणा केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीवर चर्चा केली जात आहे.
मागील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली होती. या बैठकीत शिवसेना पक्ष मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाचीही चर्चा झाली होती.
सन २०१९ ची लोकसभा निवडणूक राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP alliance) पाठिंब्यावर लढवली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडी (MVA) दोघांच्याही विरोधात बोलत असल्याने ते स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. यापुढे स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यातच आज शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीत सामील होणार का? याची चर्चा रंगली आहे. मात्र ठाकरे यांच्या भेटीनंतरही त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.