नागपूर – विरोधीपक्ष आज इव्हिएम संदर्भात खोटे कथन रचून अपप्रचार करत आहेत. पण आम्ही महाराष्ट्राला आता गतिशील सरकार देणार आहोत. इव्हिएम म्हणजे आमच्या लेखी ‘,एव्हरी व्होट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (रविवारी) विरोधी पक्षांना दिला. चहापानावर बहिष्कारासाठी विरोधी पक्षांचे पत्र हे गेल्या अधिवेशनातील पत्राचीच प्रत, नाहीतरी त्यांचे एक नेते याबाबत बोलताना पावसाळी अधिवेशन असेच म्हणाले, अशी टिकाही फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आमची सर्व विषयांवर चर्चेची तयारी असेल सभागृहातून पळ काढायचा आणि बाहेर मिडियासमोर बोलायचे असे त्यांनी दिल्लीतील विरोधी पक्षांप्रमाणे करु नये, ते लोकशाहीची सुसंगत नाही. महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी त्यांनी चर्चेला यावे, त्यांचा आवाज थांबला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
परभणीची घटना एका मनोरुग्णाकडून घडली. त्याला संविधानाचा अवमान मानून असंवैधानिक पद्धतीने उद्रेक हे डॉ. बाबासाहेबांनाही पटले नसते. आम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे हे सरकार आहे. तेथे आकसाने कारवाई झालेली नाही. तोडफोड करणारे सीसीटीव्हीत दिसतात त्यांनाच अटक झाली. बीडमधील हत्याप्रकरणी सीआयडी तपास सुरू आहे. तिघांना अटक झाली आहे, इतरांचा शोध सुरू आहे. आता विशेष एसआयटी नेमून तपास करू अशी घोषणा त्यांनी केली.
प्रश्नोत्तरात मुख्यमंत्री म्हणाले माझ्यावर आरोप, टिका करणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिले आहे. ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या कामाचे ऑडिट केले जाईल. ज्यांचे काम योग्य नाही त्यांच्याबद्दल विचार केला जाईल. आताही ज्यांचे काम योग्य नव्हते त्यांनाच वगळले. सध्या चार भगिनींचा समावेश झाला आहे यापुढे आणखी बहिणींचा समावेश होऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले.
येत्या दोन दिवसात मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होईल. पालकमंत्री निवड मात्र अधिवेशनानंतर होईल. घटकपक्षांनाही सामावून घेऊ, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चहापानावर बहिष्कार हा पायंडा पडत चालला, यापुढे चहापान ठेवावं की नाही विचार करावा लागेल.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेनेच विरोधी पक्षांवर बहिष्कार घातला, अशी टिप्पणी केली.