By Nitesh Rane
मुंबई – वाढवण बंदर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प भारताला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी केला.
वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ. राजेंद्र गावित, आ. विलास तरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक रोजगार आणि कौशल्य विकासावर भर
वाढवण बंदर प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा २६% वाटा असून, स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मच्छीमारांच्या मुलांना रोजगार प्राधान्य
वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, तो स्थानिक पालघर जिल्ह्यातील तरुणांना मिळावा, यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. मच्छीमार कुटुंबातील मुलांना रोजगाराची संधी देण्यात येईल, जेणेकरून त्यांची भावी पिढी सक्षम बनेल आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल.
प्रकल्पाला वेग देण्याचे आदेश
बंदरविकास विभागामार्फत होणाऱ्या गुंतवणुकीची सद्यस्थिती आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला.
वाढवण बंदराच्या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात गती आणावी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.