मुंबई: राज्यात जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष नसल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या गंभीर विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.
यासोबतच, डॉ. हर्षदीप कांबळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाही भेटून यासंदर्भात पत्र दिले होते, असे सुनील माने यांनी सांगितले.
६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बढती, जात पडताळणी अध्यक्ष नियुक्त
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बढती देऊन त्यांना जात पडताळणी अध्यक्ष म्हणून नेमले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सुनील माने यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीस वेग येणार असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.