मुंबई – राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली.
राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाला ८०% गुण, तर मुलाखतीसाठी २०% गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. निवड प्रक्रियेत १०० पैकी किमान ५० गुण मिळवणारे उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवड प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल
• परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिके, अध्यापन कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश करण्यात आला आहे.
• निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण केले जाणार असून, ते सीलबंद करून सुरक्षित ठेवले जाईल.
• मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांना नवीन नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. भविष्यातही हीच कार्यपद्धती सर्व विद्यापीठांमध्ये लागू राहील. त्यामुळे गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.