महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – राज्यातील सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (Security Audit) करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच बसस्थानक आणि आगारांमध्ये उभ्या असलेल्या निर्लेखन बसेस आणि परिवहन कार्यालयांकडून जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही दिल्याचे सरनाईक यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदासाठी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव गृह विभागाला तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या दालनात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन आयुक्त आणि एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानक आणि बसेसच्या सुरक्षिततेसाठी खालील महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याचे निर्देश दिले:
1. सीसीटीव्ही यंत्रणा: सर्व एसटी बसस्थानक व आगारांमध्ये एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे.
2. नवीन बसेस आणि जीपीएस: नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करावे तसेच सर्व बस गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम गतीने पूर्ण करावे.
3. स्थानिक पोलिसांची मदत: स्थानिक पोलिसांच्या मदतीने बसस्थानकांवर गस्त वाढवावी.
4. आगार व्यवस्थापन: आगार व्यवस्थापकांनी आगारातच वास्तव्य करावे, जेणेकरून व्यवस्थापनावर २४ तास लक्ष ठेवता येईल.
5. कर्मचारी ओळखपत्र: प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून फसवणुकीला आळा घालता येईल.
6. बसस्थानक आणि बसेससाठी काटेकोर नियम:
• प्रत्येक आगारात आलेल्या बसेसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे बंधनकारक करणे.
• चालक व वाहकांनी आगार सोडताना बस पूर्णतः बंद असल्याची खात्री करावी.
• सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करावी.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, बसस्थानकांवरील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर प्रशस्त व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सुरक्षित आणि प्रवासीहितासाठी सक्षम बनवण्यासाठी या उपाययोजना तातडीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात