By Santosh Kadu Patil
पालघर – राज्यातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाला काळा नारळ देऊन निषेध नोंदवण्यात आला.
किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागातील शेतकरी अतिवृष्टी, हमीभावाच्या अभावामुळे अडचणीत सापडला आहे. तूर, कापूस, सोयाबीन, भात या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे हमीभावाने खरेदी सुरू करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कापणी केलेले भात पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतजमिनींवर तरंगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.
राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी भजन, हरिपाठ करत काळे वस्त्र परिधान करून निषेध नोंदवला. “शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी नाही, ही काळी दिवाळी आहे,” असे म्हणत त्यांनी शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली.

