महाराष्ट्र ताज्या बातम्या

अग्नि सुरक्षा — सार्वत्रिक जबाबदारी

Firefighters controlling a major fire in a densely populated urban area in Mumbai

By सुधीर (हेमंत) थोरवे, नवी मुंबई

दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय अग्नि सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. १९४४ साली मुंबईतील व्हिक्टोरिया डॉक येथे झालेल्या भीषण स्फोटात अनेक अग्निशामक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो.

आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा खरोखरच गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. या दिनानिमित्ताने दरवर्षी अग्नि सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कारखाने, अग्निशमन केंद्रे तसेच सामाजिक क्षेत्रातही याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होताना दिसते.

यंदाच्या अग्नि सुरक्षा दिनाची थीम —
“सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालये आणि अग्नि सजग समाज — अग्नि सुरक्षेसाठी एकत्र येऊया”
ही समाजातील संवेदनशील घटकांवर लक्ष केंद्रित करत सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देते.

भारतामध्ये दरवर्षी हजारो आग लागण्याच्या घटना घडतात आणि हजारो लोकांचा त्यात बळी जातो. मुंबईसारख्या महानगरात दरवर्षी ५,००० पेक्षा अधिक आग घटना नोंदवल्या जातात. या केवळ आकडेवारी नसून अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घटना आहेत.

मागील एका वर्षात देशात सुमारे ८,००० पेक्षा अधिक मध्यम व मोठ्या आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या असून त्यामध्ये ७,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे ५५ ते ६० टक्के घटना निवासी भागातील आहेत. या घटनांमुळे निवासी, औद्योगिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. नोंद न झालेल्या घटनांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे.

Sudhir Thorwe — environmental and safety expert who writes on fire safety, energy and public safety issues.

मागील दोन आठवड्यांतच मुंबई आणि परिसरात अनेक गंभीर आग घटना घडल्या — मुंबई विमानतळावरील आग, भाईंदरमधील झोपडपट्टीत एलपीजी सिलिंडरचा स्फोट, सायन येथील रुग्णालयातील आग, माटुंगा येथील रेल्वे कोचला लागलेली आग, तुर्भे येथील दुकानांना लागलेली आग — अशा घटनांमुळे जीवित व वित्तहानीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनांमधून अग्नि सुरक्षेची तातडीची गरज अधोरेखित होते.

शहरे वेगाने विस्तारत आहेत आणि उंच इमारतींची संख्या वाढत आहे. अशा ठिकाणी आग लागल्यास ती नियंत्रणात आणणे अग्निशमन यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरते. निवासी भागात आगींची प्रमुख कारणे म्हणजे वाढलेला विद्युत भार, जुनी वायरिंग, शॉर्ट सर्किट तसेच गॅस गळती. अनेक घरांमध्ये सर्किट ब्रेकर असले तरी ते कार्यरत आहेत का, याबाबत जागरूकता कमी आहे.

बहुतेक सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते; मात्र देखभालीअभावी ती आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत नसण्याची शक्यता असते. व्यावसायिक आस्थापनांमध्येही परवाना प्रक्रियेसाठी यंत्रणा बसवली जाते; परंतु नियमित देखभाल नसल्याने तिचा उपयोग कमी पडतो.

अग्निशमन व्यवस्थापनाकडून कडक अंमलबजावणी आणि नागरिकांमधील वाढती जागरूकता यामुळे काही प्रमाणात आगींच्या घटनांमध्ये घट दिसत असली, तरी परिस्थिती समाधानकारक म्हणता येणार नाही. आगीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सर्वप्रथम आग लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत.

प्रत्येक सोसायटी आणि आस्थापनांनी नियमित फायर सेफ्टी ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करणे आवश्यक आहे. त्यामधील त्रुटी वेळोवेळी दूर करणे, इमारतीच्या रचनेनुसार अग्नि सुरक्षा यंत्रणा बसवणे आणि ती कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधितांना या यंत्रणेचे प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे.

अग्नि सुरक्षा ही केवळ उपाययोजना नसून तातडीची गरज आहे. योग्य नियोजन आणि सामूहिक जबाबदारी यामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते आणि पर्यावरणीय नुकसानही कमी करता येईल.

— सुधीर (हेमंत) थोरवे
(पर्यावरण व सुरक्षा विषयक तज्ज्ञ)

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

  1. Jewel Strem

    April 12, 2026

    Thank you for any other wonderful article. The place else may just anyone get that kind of info in such a perfect manner of writing? I’ve a presentation next week, and I am at the look for such information.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात