जमिनीशी नाळ तुटल्याने काँग्रेस इतिहासजमा
X: @ajaaysaroj
काँग्रेसवर सध्या डाव्या विचारसरणीचा पगडा आहे, राहुल गांधी यांच्या भोवती डाव्या विचारांचे कोंडाळे झाले आहे. त्यातच देशपातळीवर असणाऱ्या पाच पॉवरसेंटरने काँग्रेसला खड्ड्यात घातले आहे. जमिनीशी नाळ तुटल्याने वैचारिक मुद्दे, विचारसरणी, संघटनात्मक बांधणी या सर्व आघाड्यांवर काँग्रेस रसातळाला गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये असंतोष आहेच पण देशपातळीवरही काँग्रेस इतिहासजमा होत चालली आहे, असा घणाघात काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला.
आठवडाभरापूर्वीच उबाठा शिवसेना गटाचे खिचडीचोर उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार आपण करणार नसून, मुंबईमध्ये उबाठा गटाने काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी जळजळीत टीका संजय निरुपम यांनी केली होती. त्याचवेळी भारत जोडो न्याय यात्रा काढणारे काँगेस नेतृत्व त्यांच्या कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय करते, असेही त्यांनी बोलून दाखवले होते. मुंबईत काँग्रेस हद्दपार झाली असून या सर्व मनमानी कारभाराचा विरोध म्हणून उत्तर – पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा मनसुबा निरुपम यांनी त्यावेळीच जाहीर केला होता. अखेर आज त्यांनी काँग्रेस सोडण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला. हे करताना काँग्रेसच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेस वैचारिक दृष्टीने दिशाहीन झाली असून संघटना पातळीवर विखुरलेल्या अवस्थेत आहे असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
सत्तर वर्षांपूर्वीची काँग्रेस सेक्युलर गांधीईजमवर चालत होती, सेक्युलर असणे गैर नाही, त्यांनी सर्वधर्म समभाव सांगितला, कुठल्या धर्माचा द्वेष करायला सांगितला नाही. पण नंतर त्याची जागा नेहरुवीयन सेक्युलॅरिझमने घेतली आणि तिथेच सर्व घात झाला. या नेहरू विचारसरणीने हिंदू धर्माला देशाच्या मुख्य विचारधारेतूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माचा खुला विरोध केला. हिंदू धर्म मानणे म्हणजे जणूकाही ब्लास्फेमी झाली, धर्मद्रोह होऊ लागला. धर्माचे अस्तित्वच नाकारले जाऊ लागले. पण आज हा नेहरुवीयन सेक्युलॅरिझम पूर्णपणे संपला आहे, याची जाणीव काँग्रेस नेतृत्वाला नाहीच, उलट या विचारसरणीवर डाव्या विचारांचा, कम्युनिझमचा पगडा बसला आहे. त्याच विचारसरणीमुळे अयोध्येतील रामलल्ला मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. या नेहरुवीयन सेक्युलॅरिझमने देशाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला. पण प्रभू श्रीराम हा धर्म नाही, ती संस्कृतीची परंपरा आहे, हिंदुस्थानचे प्राण आहेत हेच स्वीकारायला काँग्रेस तयार नाही, याचे कारणच ही डावी विचारसरणी आहे, अशी टीका निरुपम यांनी केली आहे. काँग्रेसने नवीन विचारसरणीचा अंगीकार करणे आवश्यक आहे असंही मत त्यांनी मांडले.
सध्या काँग्रेसमध्ये, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणूगोपाल अशी पाच पॉवर सेंटर निर्माण झाली असून त्यांची प्रत्येकाची वैयक्तिक लॉबी आहे. या पाचही लॉबी आपापसात भांडत असतात व परिणामी संघटना पक्ष रसातळाला जात आहे. केंद्रातले आणि महाराष्ट्रातील अनेक नेते आउटडेटेड असून, सध्या ते भंगार मटेरियल झाले आहे. सध्याचा काँग्रेस पक्ष हा राज्याराज्यात आऊटसोर्स केलेला पक्ष असल्यासारखा चालवला जात आहे. सध्याच्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला गंज चढला असून पक्षातले बिभीषण पक्षच जाळायला निघाले आहेत. कोसळलेल्या ओसाड गावची पाटीलकी चालवणारे राज्यातले प्रमुख हे अहंकारी आहेत. आत्ताची महाविकास आघाडी म्हणजे लॉस मेकिंग कंपनीचे एकत्रीकरण आहे. उबाठाच्या विश्वप्रवक्त्यांनी एकसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेला संपवण्याचा डाव यशस्वी केला आहे. त्यामुळे अशा पक्षात राहण्याची आपली इच्छा नसून आपण काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर माजी खासदार संजय निरुपम अंतिम भूमिका घेणार असून ते शिवसेनेत जातील असे बोलले जात आहे.