मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीन (Maha Vikas Aghadi)ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर आता महायुतीकडून त्यांच्याविरोधात कोण असणार याची लागलेली उत्सुकता आता संपली आहे .कारण महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धाराशीव लोकसभा मतदारसंघातील (Dharashiv Loksabha) उमेदवार जाहीर करण्यात आला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील (Archana Patil) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील लढत होणार आहे . यामध्ये बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला धाराशीव लोकसभा मतदारसंघ आला होता. त्यामुळे अर्चना पाटील यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले. आतापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा स्वतंत्र व्यासपीठांवर केली होती. परंतु, अर्चना पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा हे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच आम्हाला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी अर्चना पाटील यांना धाराशीवमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान अर्चना पाटील या यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत . तसेच त्या भाजपा नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे, पती भाजपाचे आमदार, तर पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार अशी परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.