मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभेसाठी (Hingoli Lok Sabha) महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumthankar) यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेकडून गेल्या आठवड्यात 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या उमेदवारीला रामदास यांनी विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी अखेर आज बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर त्यांच्या विरोधामुळे शिवसेनेला हिंगोलीचा उमेदवार बदलावा लागला आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी आजा शिवसेनेकडून बाबुराव कदम कोहळीकर ( Baburao Kadam kohalikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, आमचं मतदान हे 33 टक्के मतदान आहे. विचार करून फॉर्म भरला आहे, माघार घेणार नाही. छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला आहे. ही लढाई माझी राहिली नाही कार्यकर्त्यांचा हातात गेली आहे. माझा फार्म मी भरला आहे. मी वैयक्तिक फॉर्म भरला आहे, पक्षाची भूमिका मी नाही सांगणार, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.याला बंडखोरी म्हणत नाहीत आणि आम्ही निवडून येण्याच्या क्षमतेवर सर्व लोकसभा क्षेत्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची भावना होती. हेमंत पाटलांबाबत व्यक्ती द्वेष नव्हता, पण ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना होती, असं रामदास पाटील यांनी सांगितलं आहे