मुंबई : महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला असून, केंद्र सरकारच्या डीपीआयआयटी (Department for Promotion of Industry and Internal Trade) च्या अहवालानुसार, राज्याने अवघ्या ९ महिन्यांत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक गुंतवणूक प्राप्त केली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल ₹१,३९,४३४ कोटी परकीय गुंतवणूक आली आहे. हा आकडा गेल्या १० वर्षांतील कोणत्याही संपूर्ण आर्थिक वर्षातील गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे. यामुळे राज्य सरकारने स्वतःचाच २०१६-१७ मधील विक्रम मोडला आहे.
या विक्रमी गुंतवणुकीमागे महायुती सरकारचे सक्षम नेतृत्व आणि उद्योगधोरण असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी आकर्षक धोरणे राबवली गेली. विशेष म्हणजे, या आर्थिक वर्षातील अजून एक तिमाही बाकी असताना हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
“महाराष्ट्राची ही आर्थिक घोडदौड असाच वेग राखेल,” असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले.
परकीय गुंतवणुकीच्या या वाढत्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.