१ जुलै रोजी होणार घोषणा?
मुंबई : अखेर महाराष्ट्र प्रदेश भाजपला शेवटी नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालाच. एखादी निवडणूक कशी लढवून जिंकायची याचे काटेकोर नियोजन करण्यात ज्यांचा हात कोणी धरू शकत नाहीत असे भाजपचे विद्यमान प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावावर पक्षातील बहुतांश नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नेमणुकीवर येत्या मंगळवारी १ जुलै रोजी अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाईल, अशी खात्रीलायक माहिती प्रदेश भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्यांने शनिवारी येथे बोलताना दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या सोमवारी म्हणजेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३० जूनला विद्यमान कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यशस्वीरीत्या निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. याच काळात त्यांच्याकडे कोकण विभागाचा अतिरिक्त भार असल्याने लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले होते. त्यातही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी अल्पावधीत संपादन करण्यात यश मिळवल्याने पक्षात ते खास फडणवीस समर्थक म्हणूनही ओळखू जावू लागले आहेत. त्याचीच फलश्रुती म्हणून येत्या मंगळवारी १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत
दक्षिण मुंबईच्या वरळी डोम येथे ऑडोटोरियम मध्ये त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अगदी काही आठवडे आधी त्यांची भाजप प्रणित आखिल भारतीय कर्मचारी महासंघ या कामगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्याच्या अध्यक्ष पदीही बहुमताने निवड करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या नेतृत्वावार विश्वास दाखवत सर्वप्रथम इंडिगो एअरलाइन्सच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनियनमध्ये प्रवेश केल्याने नुकतीच त्यांची वाटचाल एक यशस्वी कामगार नेते म्हणून उदयास येत आहे. त्याला कारणही तसेच आहे ते जेव्हापासून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले त्यांनी निवडणूक व्यवस्थापन कौशल्य दाखवून सोपवलेल्या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार निवडून आणले आहेत. ते मितभाषी जरी असले तरी कुठे आक्रमक व्हायचे याचे धडे त्यांनी नक्कीच गिरवलेले असावेत हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत आहे.
त्यामुळेच या कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजुजू यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल, अशीही माहिती या नेत्याने दिली.
प्रदेशाध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेले काही दिवस चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळत असून, सध्याचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने भाजपला अनुभवी, कार्यक्षम व संघटन कौशल्य असलेला अध्यक्ष मिळणार असल्याचा दावा पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत. त्यामुळेच की काय येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या रणनीतीला बळ देण्यासाठीच भाजपने हा मोठा निर्णय घेतला असून, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.