नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी आंध्रप्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देशम पार्टीच्या युतीचं निश्चित झालं आहे आणि याचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. भाजपने टीडीपीसह करार केला असून यादरम्यान अंतिम चर्चेसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि जनसेवा अध्यक्ष पवन कल्याण केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या घरी पोहोचले. यानंतर युतीची घोषणा केली जाऊ शकते.
लोकसभेच्या ८ जागांवर भाजप आणि जनसेवा मिळून निवडणूक लढवणार आहे. तर ३० विधानसभा जागाबाबतही ठरवण्यात आलं आहे. भाजप आंध्रप्रदेशमध्ये आपले प्रतिनिधी पाठवत आहे आणि चंद्रबाबू नायडूंची ‘घर वापसी’ची घोषणा करीत एक त्रि-पक्षीय पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. चंद्रबाबू नायडू गेल्या तीन दिवसांपासूव दिल्लीत थांबले आहेत. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन हैदराबादला परततील.
जागांचे वाटप अंतिम टप्प्यात
गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डासह टीडीपीचे चंद्रबाबू नायडू आणि जनसेवाचे पवन कल्याण यांनी दिल्लीत एक बैठक घेतली. यात युतीबाबत आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. आता जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. ज्यानंतर आंध्रप्रदेशात युतीची घोषणा करण्यात येईल.
लोकसभासह विधानसभेच्या निवडणुकांचीही तयारी
आंध्रप्रदेशात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. अशात जागावाटपांना उशीर होत होता, काही जागा आणि उमेदवारांवरुन भाजप आणि टीडीपीमध्ये मतभेद आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप २५ जागांपैकी ६ जागांसाठी आग्रही होती. तर टीडीपी ४ जागा देण्यासाठी तयार होती. अशात भाजप आणि जनसेवा दोघे मिळून ८ जागांवर लोकसभा आणि ३० जागांवर विधानसभा निवडणूक लढवतील.