मुंबई : “अनेक इतिहासरेषा मिसळून आपण निर्माण झालो. भाषेला राष्ट्रीय सीमा नसतात. भाषा इतर भाषांमधून शब्द घेतच समृद्ध होते. मात्र, भाषांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत, जे दूर करणे आवश्यक आहे. गेल्या साठ वर्षांत भारतातील २८० भाषा नामशेष झाल्या, आणि पुढील तीस वर्षांत आणखी ४०० भाषा लोप पावतील.”
हे हृदयद्रावक सत्य जागतिक कीर्तीचे भाषा संशोधक आणि तज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी विलेपार्ले येथील ‘मॅजेस्टिक गप्पा’ या विशेष संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले.
भाषा संशोधनाची प्रेरणा आणि प्रवास
लोकमान्य सेवा संघ प्रांगणात श्री. वा. फाटक संग्रहालय यांच्या वतीने आयोजित ४१व्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ या कार्यक्रमात डॉ. देवी बोलत होते. पृथ्वीवरील ६५,००० वर्षांचा भाषांचा प्रवास त्यांनी मिश्कील शैलीत उलगडून दाखवला.
भाषासर्वेक्षणाची प्रेरणा सांगताना ते म्हणाले, “निशब्द असणे आणि व्यक्त होणे – हे दोन्ही माझ्यासाठी मातृभाषाच आहेत. सर्व भाषांचा मला स्नेह आहे, पण मराठीचा नखरा काही औरच! १९६१ पर्यंत भारतात जनगणनेत भाषांची नोंद होत असे, पण नंतर ती थांबवण्यात आली. १९७१ मध्ये भारतात फक्त १०८ भाषा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, १९३७ च्या आकडेवारीनुसार भारतात १६५२ भाषा होत्या, त्यामुळेच भाषांचा मागोवा घेण्याचे मी ठरवले.”
याच हेतूने ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे’ सुरू करण्यात आला. गुजरातच्या आदिवासी भाषेत ‘ढोल’ हा ग्रंथ छापला, ज्याच्या ७०० प्रती आदिवासींनी आपल्या कष्टाच्या पैशांतून विकत घेतल्या. यामुळेच भाषा संशोधनाचे हे कार्य आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.
भाषेचा इतिहास आणि अस्तित्वाचा संघर्ष
भाषा जगण्यासाठी स्थलांतर महत्त्वाचे आहे, असे सांगताना त्यांनी सत्तर हजार वर्षांपूर्वी मानववंशाचा भाषिक प्रवास स्पष्ट केला.
“भाषा निर्माण झाली आणि माणूस स्वतः अनुपस्थित असलेल्या गोष्टींवरही बोलू लागला. स्थलांतराच्या प्रक्रियेतूनच पुढे खेडी निर्माण झाली, माणूस शेती करू लागला, आणि भाषा अधिकाधिक विकसित होत गेली.”
मात्र, भाषा नष्ट होण्याच्या भीषण वास्तवाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “सिक्कीममधील ‘माजी’ भाषा बोलणारे केवळ चार जण शिल्लक होते. अंदमानमधील एका जमातीची ‘बो’ भाषा जाणणारी एकच वृद्धा उरली होती. तिच्यासोबत संवाद साधणारे कोणीही नव्हते, त्यामुळे ती पक्ष्यांशी बोलत असे. ती भाषा तब्बल ६५,००० वर्षे जुनी होती, पण शेवटी तीही हरपली. भाषांचा मृत्यू माझ्या काळजाला बोचतो.”
भाषेचे संवर्धन आणि सरकारची भूमिका
“भाषा ही परकीय शब्दांमुळे समृद्ध होते, प्रदूषित होत नाही. भाषेच्या अस्तित्वासाठी सरकार नव्हे, तर लोक महत्त्वाचे असतात. सरकार फक्त लिपी असलेल्या भाषांना अधिकृत मानते, पण इंग्रजीलाही स्वतःची स्वतंत्र लिपी नाही!”
संगीतातील ‘गंधार’ हा शब्द अफगाणिस्तानातील गांधारशी संबंधित आहे. ऋग्वेदात सुमारे ३०० शब्द आर्मेनियन भाषेतून आले आहेत. भाषांचे हे मिश्रणच त्यांना अधिक सशक्त बनवते, असे ते म्हणाले.
भविष्यातील संशोधन आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण
डॉ. देवी यांनी ‘द इंडियन’ या ग्रंथनिर्मितीच्या प्रवासाविषयी माहिती दिली. जगभरातून झालेल्या चर्चेनंतर आता ते संपूर्ण जगाचा इतिहास दहा खंडांमध्ये लिहिण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत.
“अनेक संस्कृतींच्या रेषा एकत्र मिसळून आपली ओळख निर्माण झाली आहे. त्या इतिहासाचा पट उलगडायचा आहे.”
त्यांनी ‘दक्षिणायन’ या भाषिक चळवळीचा उल्लेख करताना सांगितले की, “भाषा टिकवण्यासाठी समाजाने पुढे यायला हवे. सरकारच्या धोरणांवर अवलंबून राहून काही साध्य होणार नाही.”
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या कामाचा गडगडाटी वेग सांगताना ते विनोदी शैलीत म्हणाले, “माझ्या आवडीच्या दोन गोष्टी – झोप आणि शांत राहणे! पण या दोन्हीसाठी वेळ नाही. ही चैन करण्याची संधीच मिळत नाही!”
त्यांच्या या वाक्यावर संपूर्ण सभागृह हसून दाद देत संपूर्ण सत्र टाळ्यांच्या गजरात संपले.