उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णांसाठी आधार – डॉ श्रद्धा जवंजाळ
करमाळा : श्री क्षेत्र संगोबा यात्रेनिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 2600 रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली.
विविध रुग्णालयांचा सहभाग
या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल (अहमदनगर), गांधी फाउंडेशन (कराड), सुविधा हॉस्पिटल (बार्शी), जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय (सोलापूर व करमाळा) या सात नामांकित रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण तपासणी केली.

मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया
गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (कराड) यांच्या वतीने नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले. गरजूंना डोळ्याच्या मोफत शस्त्रक्रिया तसेच लेन्सही मोफत दिल्या जाणार आहेत.
अनेक मान्यवर उपस्थित
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे, उद्योजक अजिंक्य पाटील, वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवा गावोगावी नेण्याचा संकल्प
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी, “यापुढे करमाळा तालुक्यातील प्रत्येक जत्रा व यात्रेत अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल,” असे सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कमलादेवी ब्लड बँक, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज, श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर यांच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.