पुणे – राज्यातील शेतकरी चळवळीला पुढे नेण्याची ताकद फक्त रयत क्रांती संघटनेकडे आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारी आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारी ही संघटना असल्याने तिचे योगदान मोठे आहे, असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले.
पुण्यातील जाधववर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या या बैठकीत नूतन राज्य कार्यकारणी गठित करण्यात आली. सागर खोत (सांगली) यांची प्रदेशाध्यक्ष, प्रा. सुहास पाटील (सोलापूर) यांची पक्ष प्रदेशाध्यक्ष, दीपक भोसले (सोलापूर) यांची राज्य कार्याध्यक्ष, प्रा. एन. डी. चौगुले (सांगली) यांची कोअर कमिटी अध्यक्ष, ललिता लोलगे (कोल्हापूर) यांची महिला प्रदेशाध्यक्ष आणि प्रियाताई लोडम यांची युवा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सदाभाऊ खोत म्हणाले, “मी नेहमी सकारात्मक विचारसरणीला महत्त्व देतो. साधनसामग्री देऊन चळवळी चालत नाहीत, तर कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटले पाहिजे. पद मिळाल्यावर कार्यकर्त्यांनी अहंकार बाळगू नये, तर लढाऊ वृत्तीने काम करावे.”
ते पुढे म्हणाले, “शेतकरी प्रश्नांवर लढण्याची ताकद असणारा कार्यकर्ता ही संघटनेची खरी संपत्ती आहे. ऊस उत्पादक, दूध उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात रयत क्रांती संघटनेचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांना वीज बिल माफी, पीक विमा, दुष्काळ निधी आणि दुधाला अनुदान मिळवून देण्यात संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
शेतकरी प्रश्नांवर लढण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खोत म्हणाले, “मी नेहमी कार्यकर्त्यांचे फोन घेतो, त्यांच्या अडचणी सोडवतो. हळदीची गाडी पोलिसांनी जप्त केल्यावर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले. पुण्यात कांद्याचा टेम्पो जप्त केल्यावर महानगरपालिकेच्या कार्यालयावर आंदोलन केले. ट्रॅफिक पोलिसांकडून शेतमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास थांबवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला.”
सध्या राज्यात मोठी राजकीय आणि शेतकरी चळवळीची पोकळी निर्माण झाली आहे. बहुतांश चळवळी निष्क्रिय झाल्या आहेत. “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रयत क्रांती संघटना ताकदीने लढवेल. आगामी सहा महिन्यांत प्रत्येक पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने उभारून आपली पात्रता सिद्ध करावी,” असे आवाहन खोत यांनी केले.
बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अरविंद पाटील (वाशिम), पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अमोल वेदपाठक (सोलापूर), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गजानन दांडेकर (पुणे), मराठवाडा विभाग अध्यक्ष शिवाजी पेठ (लातूर), मराठवाडा युवा अध्यक्ष गजानन राजबिंडे (जालना), विदर्भ अध्यक्ष अॅड. आशिष वानखेडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मीक सांगळे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भानुदास शिंदे आणि राहुल मोरे यांनी पुन्हा रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. त्यांच्या पुनरागमनाने संघटनेची ताकद वाढली आहे.
बैठकीच्या समारोपानंतर सदाभाऊ खोत यांनी सहकाऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला.