मुंबई : पुण्यातील अत्याचार प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त मिळाल्यामुळे ते मोकाट फिरत असून, पोलिसांवरही दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, गृह राज्यमंत्री यांनी दिलेल्या विधानावरही त्यांनी सडकून टीका केली.
पुण्यातील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर संजय राऊत यांनी विचारले की, “आरोपीला पकडून सरकारने कोणता मोठा उपकार केला आहे का?” गृह राज्यमंत्री हेच सांगत आहेत की, “आत काही हाणामारी झाली नाही, शांतपणे बलात्कार पार पडला.” जर मंत्र्यांची ही भूमिका असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी पुढे सांगितले की, “राज्यात गुन्हेगारांना असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, पोलिसांनाही ते मॅनेज करू शकतात आणि न्यायालयातून हवा तो निकाल मिळवू शकतात. त्यामुळे गुन्हेगार निर्भय झाले असून, कायद्याचा धाक राहिलेला नाही.”
राऊत यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही सवाल उपस्थित केला. “पुणे हे अजित पवारांचे गड मानले जाते, त्यांना सगळे ‘दादा’ म्हणतात, मग त्यांच्या राज्यातच कायद्याचा धाक का नाही? गुंडांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळेच अशा घटना घडत आहेत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगारांना आश्रय दिला जात असल्याचे सांगताना संजय राऊत म्हणाले, “गुन्हेगार कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात, ते कोणाचेच नसतात. पण त्यांना वरदहस्त असतो, म्हणून ते मोकाट फिरतात.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी खिल्ली उडवत टीका केली. “एकनाथ शिंदे हे मोठे साहित्यिक, कवी, लेखक आहेत. त्यांना लवकरच नोबेल पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारही मिळेल. त्यांच्या कडे अफाट पैसा आहे, इतका पैसा तर अफजलखान आणि निजामाकडेही नव्हता,” असे राऊत म्हणाले.
सेंसर बोर्डावरील व्यक्तींवर टीका करताना राऊत म्हणाले, “सेंसर बोर्डाच्या सदस्यांना पु. ल. देशपांडे अकादमीत बोलावून त्यांना मराठी साहित्य, कविता आणि दलित पँथर चळवळीचे प्रशिक्षण द्यावे. नामदेव ढसाळ कोण? हाच प्रश्न त्यांना पडत असेल, तर ते कोणत्या विचारधारेचे आहेत, हे पाहावे लागेल.”
प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातही राऊत यांनी स्पष्ट विधान केले. “त्याला कधीच पकडले जाणार नाही. कारण सरकारचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे,” असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या या आक्रमक टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळावरुन राज्य सरकारला जबरदस्त धारेवर धरण्यात आले आहे.